पुणे : शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा खर्च योग्य कामांवर होण्यासाठी व गावांचा नियोजनबद्ध विकास होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने शंभर टक्के ग्रामपंचायतींचे विकास आराखडे तयार करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदांना दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १४०७ पैकी १४०५ ग्रामपंचायतींचे विकास आराखडे तयार झाले आहेत. २ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत या आरखड्यांचे जाहीर वाचन करून मान्यता देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिनी कडू यांनी दिली. केंद्र शासनाच्या वतीने यापुढे वित्त आयोगाचा शंभर टक्के निधी ग्रामपंचायतींनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक लहान-मोठ्या ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन निधीचा खर्च योग्य पद्धतीने नियोजन करून करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींचा पुढील पाच वर्षांचा म्हणजे २०२० पर्यंतचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका असल्याने त्यांचा विकास आराखडा नंतर तयार करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने वित्त आयोगाचा ६६ कोटींचा निधी जिल्हा परिषदेला दिला आहे. हा निधी ग्रामपंचायतीला वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)यासाठी शासनामार्फत हे विकास आराखडे तयार करण्यासाठी खास ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यशदाच्या वतीने या कर्मचाऱ्यांना गावांचा विकास आराखडा कसा तयार करावा यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये १५० कर्मचारी खासगी क्षेत्रातील असून, त्यांची मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे. या लोकांनी प्राथमिक विकास आराखडा तयार करून ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेमध्ये चर्चेसाठी ठेवणे बंधनकारक आहे. २ आॅक्टोबरच्या ग्रामसभेत हे आराखडे अंतिम करण्यात येणार आहेत.- शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग
जिल्ह्यातील १४०५ ग्रामपंचायतींचे विकास आराखडे तयार
By admin | Published: October 01, 2016 3:36 AM