महाविकास आघाडीच्या काळात विकास प्रकल्पांना मिळणार दुहेरी बळ..?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:53 PM2019-11-27T12:53:13+5:302019-11-27T13:10:13+5:30
पाणी करार, शिवसृष्टी, जायका , मेडिकल कॉलेजचे भवितव्य शासनाच्या हातात
पुणे : राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस आघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने पुण्यातील विकास प्रकल्पांबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या प्रकल्पांना रखडविले जाणार की महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या विकासकामांना दुहेरी बळ मिळणार हा प्रश्न आहे.
सध्या पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा खडकवासला प्रकल्पातील नव्याने येऊ घातलेला पाणी करार, बहुप्रतिक्षित शिवसृष्टी, जायका प्रकल्प, भाजपचा महत्त्वाकांक्षी मेडिकल कॉलेज, भामा-आसखेड प्रकल्पांचे भवितव्य आता राज्य शासनाच्या हातात आहे.
पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी खडकवासला प्रकल्पातून महापालिका पाणी उचलते. यासाठी महापालिका आणि राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये करार झाला होता. हा करार आॅगस्ट २०१९ रोजी संपुष्टात आला असून, गेल्या काही महिन्यांपासून नवीन पाणी कराराचा विषय सुरु आहे. यामध्ये राज्य शासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असताना प्रस्तावित केलेला शिवसृष्टीचा प्रस्ताव राज्यात तब्बल पाच वर्षे भाजपचे सरकार असतानादेखील मार्गी लागला नाही. यामुळे नव्याने स्थापन होणारे आघाडी सरकार शिवसृष्टीबाबत काय निर्णय घेणार, केंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या जायका प्रकल्प व त्याचे भवितव्य देखील सध्या राज्य शासनाच्या हातात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सुरु झालेला भामा-आसखेड प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. अखेरच्या टप्प्यात आलेल्या भामा-आसखेड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आघाडी शासन पुढाकार घेणार का याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पुणे महापालिकेतच प्रथमच प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपने माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजचा प्रकल्प प्रस्तावित केला. सध्या मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात येणार असून, हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. भाजपचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला महाविकास आघाडी शासन मंजुरी देणार का, हा देखील प्रश्न आहे.
..........
मेट्रो, विमानतळाचे काय होणार ?
पुणे शहराच्या व जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याच्या दृष्टीने मेट्रो व पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. सध्या मेट्रो प्रकल्प अर्धवट स्थितीत असून निधी व अन्य काही किरकोळ मजुरीसाठी राज्य शासनावार अवलंबून राहावे लागते.
आगामी महापालिका निवडणुकापूर्वी मेट्रो प्रत्यक्ष सुरू करण्याचे भाजपचे नियोजन होते. परंतु आता हा प्रकल्प रखडणार का व नागपूरपेक्षा अधिक गतीने पूर्ण करुन पुणेकरांचा विश्वास संपादन करणार हा देखील चर्चेचा विषय आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीने खेड तालुक्यात प्रस्तावित केलेले विमानतळ भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर तालुक्यात हलविले आणि प्रकल्पाला गतीदेखील दिली. परंतु, विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने निधी देण्याची गरज आहे. पुढे या प्रकल्पाचे काय होणार याकडे देखील जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
..............
पालकमंत्री ठरणार महत्त्वाचा
पुण्याचे पालकमंत्रिपद हे विकास कामांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दहा वर्षे अजित पवार आणि नंतर साडेचार वर्षे गिरीश बापट पालकमंत्री होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील पालकमंत्री झाले. त्यांनी कोथरूडमधून निवडणूक लढविल्याने ते आता पुणेकरच झाले आहेत.
मात्र, सत्तास्थापनेच्या पेचात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील दोघेही पालकमंत्री होऊ शकणार नाहीत. त्यामुळे पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, यावरदेखील पुण्याच्या विकासकामांची गती अवलंबून राहणार आहे.