प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आयआरएसडीसी (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कार्पोरेशन) च्या वतीने देशातील प्रमुख स्थानकाचा पुनर्विकास करण्याचे काम सुरू आहे. गांधीनगर, हबीबगंज स्थानकाचा पुनर्विकास देखील झाला. मात्र रेल्वे प्रशासनाकडून जागेची स्पष्टता नसल्याने पुणे स्थानकाचा पुनर्विकासचा अद्याप डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) देखील तयार झाला नाही. त्यामुळे पुणे स्थानकाचा विकास दिवास्वप्न तर ठरणार नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे.
आयआरएसडीसीने अडीच वर्षांपूर्वी पुणे व शिवाजीनगर स्थानकाचा पुनर्विकास करणार असल्याचे जाहीर केले. मात्र या साडेतीन वर्षांत दोन्ही स्थानकांचे डीपीआरदेखील तयार झाले नाही ही वस्तुस्थिती आहे. देशातील प्रमुख स्थानकापैकी एक असलेल्या पुणे स्थानक पुनर्विकासपासून अजून लांबच आहे. याला रेल्वेची उदासीनता जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
बॉक्स १
डीपीआरनंतर किमान चार वर्षे :
पुणे स्थानकाच्या विकासासंदर्भात डीपीआर तयार होण्यास अजून किती वेळ लागेल हे निश्चित सांगता येत नाही. मात्र डीपीआर तयार झाल्यावर स्थानकाच्या विकासाचे काम पूर्ण होण्यास किमान चार वर्षांचा कालावधी लागेल. त्यानंतर पुणे स्थानक जागतिक दर्जाचे बनणार आहे.
बॉक्स २
काम सुरू होताच प्रवाशांना द्यावे लागणार कर :
आयआरएसडीसीकडून जेव्हा पुणे व शिवाजीनगर स्थानकाचे पुनर्विकासाचे काम प्रत्यक्षात सुरू होईल. तेव्हा फलाटाचे तिकीटदर, पुणे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या व पुणे स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांच्या तिकीटदरात वाढ होणार आहे. प्रवाशांकडून स्टेशन विकासाचा कर घेतला जाईल. त्यानंतरही हा कर घेणे चालूच राहणार आहे. शिवाय स्थानकांवरील अन्य प्रवासी सुविधादेखील महाग होतील.
कोट : १
पुणे स्थानकावरील जागेसंदर्भात अजूनही काही कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे डीपीआर तयार करण्यास आणखी काही वेळ लागेल. जेव्हा डीपीआर पूर्ण होईल तेव्हा त्याच्या निविदा काढून कामाला सुरुवात होईल. डीपीआरला आणखी किती वेळ लागेल हे आताच सांगता येणार नाही.
- अनिल कुमार, मुख्य जनसंपर्क अधिकारी,
आयआरएसडीसी, नवी दिल्ली.
कोट : २
आयआरएसडीसीकडून जे काही प्रस्ताव आले त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत रेल्वेकडे त्यांचा प्रस्ताव आलेला नाही. भविष्यात काही प्रस्ताव आले तर त्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल.
- मनोज झंवर ,जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे.
फोटो - पुणे रेल्वे स्टेशन