मार्गासनी : महाराष्ट्र राज्याचा विकास महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात झाला असून सरकारच्या माध्यमातून विकास कामासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले. तोरणा गडावरील विद्युतीकरणाच्या उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, महाराष्ट्र राज्याचा विकास महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात झाला असून विविध विकास कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. इथून पुढे देखील सुरू राहणार आहेत. तसेच वेल्हे तालुक्यातील महाडमध्ये घाट रस्त्यासाठी विशेष लक्ष देणार असून तालुक्यातील रस्ते विविध ठिकाणी लाईटच्या योजना धरणग्रस्तांचे प्रश्न यासाठी विशेष बैठका लावून लक्ष देणार आहे.
''तालुक्यातील प्रशासकीय इमारतीच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी व इतर मुख्य अधिकारी यांची समिती स्थापन केली आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच प्रशासकीय इमारतीचा निर्णय घेतला जाईल. वेल्हे तालुक्यातील जनतेच्या मतानुसारच प्रशासकीय इमारत योग्य त्या ठिकाणी बसवली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.''
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- महाविकास आघाडी सरकार माध्यमातून विकास कामे सुरू आहेत त्यामुळे तालुक्यात देखील त्याच प्रमाणे एकत्रित येऊन कामे करावीत
- आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार आग्रही आहे जुन्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता आरक्षणाचा विचार केला जाईल
- शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी लवकरच तोडगा काढला जाईल
- वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाच्या रेट्यामुळे केंद्र सरकारला आपले कायदे मागे घ्यावे लागले
- वेल्हे महाड या रस्त्यासाठी लक्ष घालून बैठका लावून नोकरीचा मार्ग मोकळा केला जाईल