पुणे : अनेक वर्षांपासून पडलेले खड्डे दुरुस्त होऊ लागले... अरे हा तर काल किती खराब झालेला रस्ता आज किती छान दिसतोय... विकासकामे सुरू असल्याचे फोटो फेसबुकवर झळकू लागले अन् त्याला लाइक्सही मिळू लागले... पुणे कॅन्टोन्मेंट परिसरात अचानक हे विकासाचे वारे पाहून नागरिक अचंबित झाले. त्यांना या विकासाचे कोडं समजेना! अन् या विकासकामांमागील खरे गूढ उलगडले. कारण केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री येणार होते. त्यांच्यासाठी हा सर्व ‘तामझाम’ सुरू होता. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला दोनशे वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त द्विशताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्र्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधींना विकासकामे करण्याचा ‘आदेश’च आल्यासारखे ते कामाला लागले. कॅन्टोन्मेंट परिसरातील गुळगुळीत झालेले रस्ते पाहून नागरिकांना मात्र छान वाटले. ‘लोकप्रतिनिधी चांगले आहेत, ते काम करू लागले आहेत,’ अशा भावना नागरिकांच्या मनी दाटून आल्या. परंतु, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री येणार म्हणून हे सर्व चालले होते. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समोरील रस्त्यावर एका आठवड्याच्या आत सुंदरशी कमान उभी करण्यात आली. आजूबाजूला विविध रंगांचे झेंडे लावण्यात आले. हे सर्व केवळ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री येणार यासाठीच केले जात असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. कारण गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे पडलेल्या रस्त्यांमधून जाताना या नागरिकांना अनेकदा पाठीला दणके बसलेले आहेत. तरीदेखील लोकप्रतिनिधींना हे रस्ते दुरुस्त करण्याचा मुहूर्त मिळाला नाही. हा मुहूर्त खुद्द संरक्षण राज्यमंत्री आल्यावरच मिळाला. या संरक्षण राज्यमंत्र्यांनी येऊन जणू काही खड्डे पडलेल्या रस्त्यांना डांबराचे ‘संरक्षण’ दिल्याचा अनुभव येत आहे.
नुसती आश्वासनांची खैरात...पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला भेट देण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री जेव्हा येतात, तेव्हा बोर्डाच्या परिसरातील तक्रारींचे निवेदन त्यांना देण्यात येते. दर वेळी संरक्षणमंत्री आम्ही हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन देतात. लष्कराने अनेक रस्ते बंद केले आहेत. तसेच घोरपडी रेल्वे गेट बंद झाल्यानंतर कितीतरी वेळ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते. या समस्या लवकरच सोडवू, अशी आश्वासनेच केवळ प्रत्येक भेटीला मिळत आहेत. त्यावर तोडगा मात्र अजून कोणत्याही संरक्षणमंत्र्यांनी काढलेला नाही.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या द्विशताब्दी वर्षाच्या निमित्ताने शनिवारी पुण्यात मोठा कार्यक्रम झाला. देशाचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे साहेबांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. साहेब कार्यक्रमाला येणार म्हणून बोर्डाच्या हद्दीतील रस्त्याचे डांबरीकरण केले. बोर्डाला काही महिन्यांपूर्वी हेच रस्ते दुरुस्त करायला वेळ नव्हता. नागरिकांसाठी चांगल्या सुविधा हे कॅन्टोन्मेंट बोर्ड देत नसेल, तर द्विशताब्दी साजरी करायची कशासाठी?
- अनिकेत राठी, सदस्य, परिवर्तन