बारामती/इंदापूर : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्याने पुणे जिल्हा परिषदेस पाच नवे तरुणतुर्क सदस्य दिले आहेत. या सर्वांनी पहिल्यांदाच निवडणूक लढविली. त्यामध्ये अभिजित तांबिले यांचे वय फक्त २२ वर्षाचे आहे. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे प्रश्न सोडविले जाणार आहेत. पारंपरिक प्रश्नांबरोबरच शाळांचे आधुनिकीकरण, तांत्रिक शिक्षणाची गोडी निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे या तरुण सदस्यांनी सांगितले.बारामती तालुक्यातून ३२व्या वर्षी जिल्हा परिषदेच्या शिर्सुफळ-गुणवडी गटातून निवडून आलेले रोहित राजेंद्र पवार यांना कंपनी व्यवस्थापनाचा अनुभव आहे. अगदी कमी वयात त्यांनी व्यवसाय संभाळला आहे. एका साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते कार्यरत असताना खासगी साखर कारखान्यांच्या संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या संदर्भात सांगितले की, जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा देणारी संस्था आहे. ग्रामीण भाग, ग्रामीण जनता या संस्थेशी जोडलेली आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, महिला बालकल्याण, बांधकाम आदींच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जिल्हा परिषदेची नाळ जोडलेली आहे. त्यामध्ये दर्जेदार शिक्षण ग्रामीण भागातील शाळांमधून कसे मिळेल, तेथे सुविधा कशा देता येतील, नागरिकांचे प्रश्न हेलपाटे न मारता मार्गी कसे लागतील, यावरच लक्ष दिले जाईल. प्रवीण माने हे औद्योगिक व्यवस्थापनाचा गाढा अनुभव असलेले,लोकांना आपणाकडून काय अपेक्षित आहे, आपणास नेमके काय करायचे आहे याची पक्की जाणीव असणारे व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण तालुका विशेषत: पळसदेव बिजवडी गटात त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. संवाद साधण्याच्या वृत्तीमुळे या भागात असणाऱ्या अनुकूल-प्रतिकूल बाबींची, सामाजिक सार्वजनिक समस्यांची त्यांना माहिती आहे. त्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याचा आराखडा त्यांच्या मनात अगदी नक्की आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना प्रवीण माने यांनी सांगितले, या भागातील समस्या सोडवताना त्यांच्या मुळाशी जाण्याचा आपला प्रयत्न रहाणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या सर्व सामूहिक, वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांना वेळेत मिळण्यासाठी प्रयत्नशील राहू. याशिवाय आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आदींचा प्रश्न प्रभावीपणे सोडविण्यासाठी प्रयत्न करणार. पळसदेव-बिजवडी गटातील जनतेच्या निगडित सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.लासुर्णे : या गटात असणाऱ्या समस्या प्रामुख्याने सोडविल्या जातील. या गटातील जनतेने मतदान करून जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास सागर भोसले यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य नागरिकांना विकासातून न्याय देण्याचे काम करणार आहे. यामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून लासुर्णे व सणसर येथे असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अडचणींवर भर दिला जाणार आहे. लासुर्णे व सणसर भागातील रस्ते, वीज, पाणी या अडचणी सुरूवातीला सोडविल्या जातील. या गटात असणाऱ्या प्राथमिक शाळांच्या अडचणी जाणून घेऊन शाळेतील पटसंख्या वाढविण्यावर भर देऊन दर्जा सुधारणेच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. या भागातील बऱ्याच ठिकाणी अजूनही पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. बऱ्याच भागात रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच प्रवास करताना कळत नाही. त्यामुळे रस्त्यांची कामे मार्गी लावण्यावर भर दिला जाईल.
तरुणांच्या हाती विकासाचा गाडा
By admin | Published: February 25, 2017 2:17 AM