पुणे : बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करणा-या दुस-या हल्लेखोराला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.
डेक्कन पोलिसांनी गेल्या रविवारी जळगाव येथून रवींद्र चोरगे याला पकडले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन मंगळवारी सकाळीच डेक्कन पोलिसांच्या पथकाने ठाणे येथे जाऊन दोघांचीही पिस्तुले ठेवून घेणा-या सुरेंद्र पाल याला अटक करुन २ पिस्तुले हस्तगत केली होती. त्यामुळे या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी राहुल शिवतारे याच्याभोवती सर्व पोलिसांचे लक्ष केंद्रीत झाले होते. सिंहगड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मंगळवारी रात्री राजाराम पुलाजवळ राहुल शिवतारे याला पकडले असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी दिली.
दरम्यान, देवेन शहा खून प्रकरणात डेक्कन पोलिसांनी ठाणे येथून आणखी एकाला अटक केली आहे. सुरेंद्रपाल असे त्याचे नाव आहे. रवी चोरगे याला रविवारी अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहिती वरून पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींनी सुरेंद्रपाल याच्याकडे पिस्तुले ठेवली होती. त्याला अटक करून ती जप्त करण्यात आली आहे. डेक्कन पोलिसांनी कालच रवींद्र सदाशिव चोरगे (वय ४१, रा़ निलपद्म सोसायटी, अमृतनगर, माणिकबाग, सिंहगड रोड) याला रविवारी जळगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली होती. रवी चोरगेकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्याने काही माहिती दिली आहे़ देवेन शहा यांच्याबरोबर रवींद्र चोरगे आणि राहुल शिवतारे यांचा संपर्क होता़ रवी रियल इस्टेटचे काम करतो़ शेतकऱ्यांच्या जमिनी एकत्र करून त्या मोठ्या रियल इस्टेट एजंटांना विकणे व त्यातून कमिशन घेणे, असा त्याचा व्यवसाय होता.