त्यावेळी आम्ही तिघेही वेगळ्या पदावर होतो, विकासासाठी आज एकत्र आहोत- देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 02:02 PM2023-08-01T14:02:40+5:302023-08-01T14:04:42+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्त मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे आणि पीएम आवास योजनेचे लोकार्पण पार पडले...
पुणे : सध्याचे राज्य सरकार हे तीन इंजिनचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात देशाचा विकास वेगवान होत आहे. सामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम देशाचे पंतप्रधान करत आहेत. मोदींच्या हस्ते मिळणारे घर विकण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडवा, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्त मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे आणि पीएम आवास योजनेचे लोकार्पण पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यातील मागील मेट्रोच्या उद्घाटनावेळी मी, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान होते. पण त्यावेळी आम्ही तिघेही वेगळ्या पदावर होतो. मी विरोधी पक्ष नेता होतो, दादा उपमुख्यमंत्री होते आणि शिंदे हे नगरविकास मंत्री होते. पण आज विकासासाठी आम्ही सर्व जण एकत्र आहोत आणि वेगळ्या पदावर आहोत. आगामी काळात एकही व्यक्ती बेघर राहणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पुणे ही जशी उद्योग नगरी आहे तशीच स्वप्न पूर्ण करणारी नगरी म्हणूनही आम्ही पुण्याचा विकास करू, असंही फडणवीस म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनेही पंतप्रधानांच्या कामाचे कौतुक केले. शिंदे म्हणाले, टिळक पुरस्कारामुळे मोदींच्या कार्याला आणखी बळ मिळेल. पंतप्रधान राज्यात येतात तेंव्हा काम करण्याचे बळ मिळते. समविचारी सरकार असल्यावर कामाला वेग येतो. आयोध्येचे मंदिर बांधण्याचे काम किंवा काश्मिरमधील ३७० कलम रद्द करण्याचे काम मोदींनी केले आहे.