पुणे: आज पुण्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना कुठलीही अपेक्षा न ठेवता पुढील वर्षभर काम करण्याचे आवाहन केले. तसेच, पक्षासाठी आपल्याला त्याग करायचा आहे, तुमच्यासाठी मीदेखील त्याग करायला तयार आहे. तुम्ही म्हणत असाल तर, पद सोडतो, वर्षभरासाठी घरही सोडतो, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
भाजपला कर्नाटकातला पराभव जिव्हारी लागला आहे. या पराभवावरुन धडा घेत पक्षाने आतापासूनच आगामी विधानसभा आणि लोकसभेची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात राज्य कार्यसमितीची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. '2018 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड निवडणुकांनंतर विरोधी पक्षाकडून भाजप संपल्याची टीका केली जायची, मात्र सहाच महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण या तीनही राज्यांमधील लोकसभेच्या सगळ्या जागा जिंकल्या. यावेळीही तसंच होणार आहे. महाराष्ट्रात भाजपने 2014 साली 42 जागा जिंकल्या, 2019 सालीही तेवढ्याच जागा जिंकल्या आणि आता 2024 मध्ये त्यापेक्षा जास्त जागा जिंकू,' असं फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणतात, 'आगामी निवडणुका ना लोकसभेच्या, ना विधानसभेच्या, ना गावाच्या आहेत, तर आगामी निवडणुका बूथच्या आहेत. बूथ सशक्त करणे का गरजेचे आहे, हे आपल्याला कर्नाटक निकालातून दिसून आलंय. कारण तेथील पाच जागा या आपण 700 पेक्षा कमी मतांनी हरलो आहे, तर 30 हून अधिक जागा या तीन ते चार हजार मतांच्या फरकाने हरलो आहोत. त्यामुळे आपल्याला आगामी काळात बूथ सशक्त करण्याचे महत्वाचे काम असणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.
यावेळी फडणवीसांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली आहे. राज्यात टीआरपी कसा मिळवायचा याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. शरद पवारांनी मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो, त्यानंतर पक्ष राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल, त्यावर ठराव घेईल आणि मीच परत राजीनामा मागे घेऊन आपल्या स्थानावर येईन असा गोंधळ घातला होता, अशी टीका फडणवीस यांनी केली. एकप्रकारे पवारांनी ठाकरेंना उदाहरण दिल्याचे फडणवीस म्हणाले.