शिरूर : राज्यभर गाजत असलेल्या संतोष देशमुख खून प्रकरणातील सर्व आरोपींचा बॉस धनंजय मुंडे आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी येथे केले.
छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईकडे जात असताना दानवे यांनी शिरूर येथे शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपट शेलार यांच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दानवे म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी सगळ्यात पहिली शिवसेनेने केली आहे. ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी सगळ्यात पहिला जाणारा मी आहे. तोपर्यंत याची दाहकता, तीव्रता, यातील राजकारण, अर्थकारण याची महाराष्ट्राला माहिती नव्हती. याबाबतचा आवाज अधिवेशनामध्ये सर्वप्रथम उठवून याची माहिती महाराष्ट्राला, जनतेला दिली आहे. त्यानंतर तेथील आमदार, राजकीय पक्ष यांनी आवाज उठवला. या गंभीर गोष्टीला हात घातला आहे. हजारो कोटींची संपत्ती जमवणारा वाल्मीक कराड याची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी मी केली आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का लागला आहे. लवकर तुम्हाला वाल्मीक कराडला मोक्का लागलेला दिसेल, असेही दानवे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत कुठले मतभेद होणार नाहीत
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी इच्छा शिवसैनिकांची आहे. म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून होकार येण्याची शक्यता आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकांत उमेदवार संख्या कमी असते. यात वाटाघाटी होऊ शकतात. यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी लढवल्यामुळे महाविकास आघाडीत कुठले मतभेद होणार नाहीत.
शिवसेनेत असे अनेक माऊली
शिरूर विधानसभेमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख माउली कटके हे दुसऱ्या पक्षात गेले आणि निवडून येऊन आमदार झाले. शिवसेनेत असे अनेक माउली कटके आहेत की त्यांची निवडून येण्याची क्षमता आहे. परंतु आघाडीमुळे त्यांना वेगळा विचार करावा लागला. आमदार माउली कटके आणि आमचे या अगोदर नाते होते. आताही नाते आहे. भविष्यात वेळ पडली तर परिवर्तन होऊ शकते, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना केले.