...आणि यावेळी भर दुपारी : मुहूर्त नव्या वर्षातल्या पहिल्या दिवसाचा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. येत्या शुक्रवारी (दि. १) महापालिकेच्या भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पवार आणि फडवणीस एकत्रितपणे करणार आहेत.
सन २०१३ मध्ये राज्यात आणि पुणे महापालिकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना भामा-आसखेड प्रकल्पाची आखणी झाली. पुढे राज्यात आणि महापालिकेत भाजपाची सत्ता असताना या प्रकल्पाला गती मिळाली. अखेरच्या टप्प्यात पुन्हा राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत आली. त्यामुळे भामा-आसखेड प्रकल्पावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली होती.
या प्रकल्पाचे उद्घाटन कोणी करायचे यावरुन भाजपाचे शहराध्यक्ष आणि वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक आणि आजी आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील टिंगरे यांच्यात जुंपली होती. “शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना पाणी पुरवणाऱ्या या प्रकल्पाची पूर्तता आपल्या प्रयत्नातून झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी अर्थसहाय्य केले. त्यामुळे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते व्हावे,” अशी भूमिका मुळीक यांनी घेतली होती. “हा प्रकल्प अजित पवार यांच्यामुळेच सन २०१३ मध्ये आला. त्यांच्याच कार्यकाळात तो पूर्ण झाला. त्यामुळे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते झाले पाहिजे,” असे टिंगरे म्हणत होते.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी (दि. ३०) पत्रकारांना सांगितले की, ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चे लोकार्पण सोहळा १ जानेवारीला दुपारी चार वाजता ऑनलाईन होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ़ नीलम गोऱ्हे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत़
चौकट
भामा-आसखेडची प्रगती
-सन २०१३ मध्ये मंजूर झालेल्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’चे काम सन २०१४ मध्ये सुरू झाले़
-५८३ कोटी रूपयांचा प्रकल्प सन २०२० पूर्ण झाला.
-२०० दशलक्ष लिटर प्रति दिन पाणी या प्रकल्पामुळे पूर्व भागातील कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, वडगावशेरी या परिसरातील नागरिकांना मिळणार आहे़