पुणे : ‘‘आरक्षणासाठी वर्षभरापासून लढतोय. आता सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी झाली की आपण जिंकलो, जर दगाफटका झाला तर आपण २९ तारखेला पाडायचे की, उभे करायचे हे ठरवू. देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना दंगली घडवायच्या आहेत. पण त्यांचे स्वप्न आपण पूर्ण होऊ द्यायचे नाही. ओबीसीच्या अंगावर जाऊ नका. राज्यात सर्वत्र शांतता ठेवा. मराठ्यावर संकट आले तर एकजूट राहून सामोरे जा,’’ अशी जोरदार टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील राज्यात शांतता रॅली काढत आहेत. ही रॅली आज (दि.११) पुण्यात दाखल झाली. रॅलीचे जल्लोषात स्वागत कात्रज येथे करण्यात आले. त्यानंतर ही रॅली स्वारगेटमार्गे सारसबागेसमोर आली आणि तिथून डेक्कन येथे रॅलीचा समारोप झाला. या वेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला.
जरांगे पाटील म्हणाले, मी पुण्यातील सर्व समाजबांधवांचे आभार मानतो, आरक्षणाच्या लढ्यामध्ये माझ्यासोबत ते राहिले. ही लढाई माझी एकट्याची नाही, सर्व समाजाची आहे आणि मी समाजासोबत शेवटपर्यंत राहणार आहे. आपल्याला आरक्षण मिळवायचे असेल, तर आपली माणसे विधानसभेत हवीत. पण ते आपण २९ तारखेला ठरवू. आपण २८८ जागांची चाचपणी केलीय. लवकरच आपले उमेदवार पुढं येतील.’’
"माझी बदनामी करायचे खूप कट केले. ओबीसी समाजातील काही लोकं आणि मराठा समाजातील काही लोकं मला बदनाम करत आहेत. पण मी मागे हटत नसतो. माझ्यावर एसआयटी लावली. देवेंद्र फडणवीस याने मला कोंडीत पकडायचा प्रयत्न चालवला आहे. पण मराठ्यांचा हिसका त्याला आपण दाखवू. आपण या विधानसभेत काय करायचे ते ठरवू. पाडण्यात बी लय मजाय, पाडा-पाडी सुरू केली तर एक बी निवडून येणार नाय. सर्वांनी एकजूट ठेवा, मराठ्यांची शान जाता कामा नाय. मराठ्यांची शान वाढवायची जबाबदारी आपलीय. जो नेता मराठ्यांच्या नादी लागेल, त्याला आयुष्यात निवडून देऊ नका. माझ्या कोणत्याही मराठ्यांना त्रास दिला, तर याद राखा. इथून पुढे गाफील राहू नका.’’
आरक्षण द्या नाही तर सत्ता जाणार !
जो गोळ्या घालून मारील त्याची जात शिल्लक ठेवणार नाही. मराठ्यांच्या नादी लागणं सोपं नाही. समाजाच्या विरोधात नाटकं करू नका. समाजापुढं कोणतीच सत्ता टिकत नाही. समाजाची शक्ती सोपी नाही. मी संयमी हाय, म्हणून सांगतोय. फडणवीसने माझ्या समाजाचे रक्त सांडलं. आता बस्स झालं. मी संयमी हाय म्हणून त्याच्या विरेाधात काही केलं नाही. पण यापुढे अंगावर आलात तर याद राखा, असा दम जरांगे पाटील यांनी दिला.
जरांगे पाटील यांच्या मागण्या
मुख्यमंत्र्यांना मागणी करतोय की, ईडब्ल्यूएस पुन्हा सुरू करा, एसीबीसी, कुणबीचे ऑप्शन पण सुरू ठेवा. मराठा आणि कुणबी एकच आहेत. दोघांचा व्यवसाय एकचय. कुणबीला आरक्षण दिले, ते व्यवसायावर दिले. आज मराठा सोडून इतर साडेतीनशे जाती आहेत. त्या कशा वाढल्या ? अनेक जाती पोटजात म्हणून आरक्षणात घातली हाय. मग कुणबी आणि मराठा वेगळा का करता ? दोन्ही एकच आहे, ते जाहीर करा अन्यथा मी सरकार पाडू शकतो. सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी तत्काळ करा. या राज्यात झालेले सर्व गुन्हे मागे घ्या. सरसकट गुन्हे मागे घ्या. मराठवाडाचे गॅझेट, बॉम्बे, हैदराबादचे गॅझेट लागू करा. सर्व आमच्या मागण्या मान्य करा. जर २९ ऑगस्टपर्यंत हे नाही केले तर आमचा निर्णय ठरला. आम्ही पाडायचे की, उभे करायचे ते ठरवू. माझ्या समाजाला मी धोका देणार नाही. मी शिंदे सायब आणि फडणवीस या दोघांना सांगतो, तुम्हाला संधी आहे. आमच्या हक्काचे आरक्षण द्या, नाही तर या राज्यात मराठे तुमचे एकचही सीट निवडून देणार नाहीत.
माझं शरीरही समाजासाठी !
मी या जगात नसलो तरी मराठा समाज एक राहिला पाहिजे. मी पूर्ण आयुष्य माझ्या समाजाला दिलंय. मी मेल्यावर माझं अवयव दान करण्याचा निर्णय घेतलाय. माझं शरीर देखील समाजासाठी देणारय. सातारामधील बांधवांनी शरीर दानाची घोषणा केली.
मला गोळ्या घालाव्या लागतील !
‘‘मी समाजासाठी लढतोय. विकला जाणार नाही. माझी इमानदारी शेवटपर्यंत विकली जाणार नाही. मला काम करू द्यायचे नाही, म्हणून फडणवीस माझ्यासाठी सापळा रचतोय. मी कोणाचे ऐकत नाही, म्हणून ते जाळ्यात पकडत आहेत. पण मी गद्दारी करणार नाय. त्यांच्याकडे एकच पर्याय हाय. गोळ्या घालून मला मारून टाकनं. त्याशिवाय मी संपणार नाय,’’ असे प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी दिले.फडणवीस तुमची जहागिरी नाहीय !
फडणवीस तुमची जहागिरी नाहीय. हा समाज तुम्हाला मोठा करणारय. तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा. अन्यथा आम्ही तुमचा करेक्ट कार्यक्रम करू. आमच्या अंगावर येऊ नका. मी लढायला खंबीर आहे, त्यांनी कितीही षडयंत्र रचले तरी ते पाडायला खंबीर आहे. मला तुम्हा सर्वांची गरज आहे. आता मला उघडं पडू देऊ नका. यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण मिळवून देतो. फक्त तुम्ही पूर्ण राज्य एकत्र ठेवा. राज्यात शांतता ठेवा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.