मुंबई - राज्यात आज लोकसभा निवडणूक झाली तर महायुतीला जोरदार फटका बसेल आणि महाविकास आघाडीला यश मिळेल असा अंदाज सी व्होटरच्या सर्व्हेमधून दिसून आला. या सर्व्हेवर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची प्रतिक्रिया त्यात शरद पवारांनी सर्व्हेवर भरवसा ठेऊ नका असं थेट स्पष्ट शब्दात सांगितले. तर, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या सर्वेक्षणावर बोलताना महाविकास आघाडी ४० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. आता, यावर उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या स्टाईलने प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना सी-व्होटर सर्वेक्षणाचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये, महाविकास आघाडीला जास्त जागा मिळत असून भाजपाच्या जागा कमी झाल्याचं दिसत आहे, असे त्यांना विचारले. त्यावर, ''मी सर्वच सर्व्हेचा सन्मान करतो, पण ए-व्होटर असो, बी व्होटर असो, सी-व्होटर असो, डी-व्होटर असो किंवा झेड-व्होटर असो... हे लक्षात ठेवा, फक्त मोदींची हवा आहे. जनतेनं ठरवून टाकलंय की मोदींनाच व्होट द्यायचे. त्यामुळे, आम्ही ४० पार जाणार म्हणजे जाणारच..'' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना, घाबरण्याचं कारण नाही. कोणीही पॅनिक होऊ नये. मात्र, काळजी व खबरदारी घ्यायला हवी. कारण, यापूर्वी आपण सर्वांनीच गंभीर परिस्थितीचा सामना केला आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले.
सर्व्हेवर काय म्हणाले शरद पवार
शरद पवार म्हणाले की, सर्व्हेवर अवलंबून राहून कुणी निष्कर्ष काढू नये. सर्व्हे नेहमी येत असतात. त्यात ते अनेकवेळा खरे खोटे असतात. आताच पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्याचे सर्व्हे वेगळे आकडे सांगत होते. पण प्रत्यक्षात लोकांनी अंतिम निकाल वेगळा दिला अशा शब्दात पवारांनी लोकसभा निवडणुकीबाबत आलेल्या सर्व्हेवर प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे सर्व्हे?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. इथं काँग्रेस-उबाठा-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचा पगडा भारी असल्याचं दिसून येते. जर महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर सर्व्हेनुसार, इथं महायुतीला १९-२१ जागा तर महाविकास आघाडीला २६-२८ जागा आणि इतरांना ०-२ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर मतांच्या टक्केवारीत महायुतीला ३७ टक्के, काँग्रेसला ४१ टक्के आणि अन्य २२ टक्के मते मिळतील असं बोललं जात आहे.