पुणे :महाराष्ट्रातील एका थोर लेखकांनी १५-२० वर्षांपूर्वी हिंदूत्वाची शाल कोणी पांघरली, खरं हिंदूत्व कोणाच्या रक्तात आहे, हे लिहिले आहे. त्याचा अभ्यास प्रत्येकाने करावा. आताही काही पक्षांनी हिंदूत्वाची शाला पांघरली आहे. ते त्या पक्षांना व्यवस्थित माहिती आहे. ज्या प्रकारे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढतोय, त्यांची पोलखेल करतोय. आमचा घाव ‘त्या‘ पक्षांच्या वर्मी बरोबर बसला आहे. भ्रष्टाचाऱ्यांमध्ये अस्वस्थतता पसरली असल्याने आमच्या यात्रांवर त्यामुळेच हल्ला करत आहे. त्यांना स्पष्टपणे सांगतो. कितीही हल्ला करा, पोलखोल थांबणार नाही, आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढतच राहु, असा थेट इशारा नाव न घेता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
‘भाजपा : काल, आज आणि उद्या‘ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरसचे आमदार राम सातपुते, सिद्धार्थ शिरोळे, भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुस्तकाचे मूळ लेखक शांतनू गुप्ता, अनुवादक मल्हार पांडे, काॅन्टिनेन्टलचे ऋतुपर्ण कुलकर्णी, अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मॅक्समूलरने खोटा इतिहास रूजवला; आर्य मूळचे भारतीयचमॅक्समूलरने पद्धतशीरपणे ‘आर्य‘ हे मध्य युरोपातून आल्याचा खोटा इतिहास रूजवला. तोच इतिहास आपल्याला हजारो, शेकडो वर्षे शिकविला गेला. मात्र, अनेक इतिहासकारांनी संशोधनातून ‘आर्य‘ हे मूळचे येथील असल्याचे सिद्ध केले आहे. जगात सर्वात जुनी भारतीय संस्कृती आहे. राम मंदिर, कृष्ण मंदिर अथवा काशी विश्वेश्वर, सोमनाथाच्या मंदिराची केवळ तोडफोड नाही. तर भारतीयांचा विचार, संस्कृती संपवणे हाच डाव आधी मोगलांचा होता. तोच कित्ता पुढे इंग्राजांनी सुरू ठेवला. कारण मशिद बांधणे हा उद्देश नव्हता. तर भारतीयांचे श्रध्दास्थान असलेल्या राम मंदिर, कृष्णाच्या मंदिरे पाडून त्या जागेवर मशिद बांधून भारतीयांची संस्कृती नष्ट करण्याचा डाव होता, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हिंदूत्वाची शाल नक्की कोणी पांघरली
राज ठाकरे यांनी आता हिंदूत्वाची नवी शाल पांघरली आहे, या प्रश्नावर येणारा काळच उत्तर देईल, असे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले, की हिंदूत्वाची शाल शिवसेनेने पांघरली आहे कि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे त्यांनाच विचारा. हे मी कोणाला बोललो आहे, त्यांना ते बरोबर समजले आहे. तसेच राज ठाकरे आयोध्या दौऱ्यावर असताना त्यांना सुरक्षा देणार का, याबाबत मला त्याबाबत बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगत उत्तर देणं टाळले.
फडणवीस म्हणाले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष हे हिंदुत्ववादी विचारांचे वाहक आहेत. भारतीय जनता पक्ष ही केवळ एक यंत्रणा असून हिंदुत्वाच्या विचारांचे वाहक आहेत. पक्ष येतील, जातील, नेतृत्व बदलेल पण हिंदुत्वाचा विचार कायम राहिल.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंदुत्वाच्या विचारधारेवर वाटचाल करणारा भाजप हा केवळ १९८० मध्ये स्थापन झालेला राष्ट्रीय पक्ष नसून याला पाच हजार वर्षांचा पुरातन इतिहास लाभलेला आहे. त्यामुळेआमच्यामुळे भाजप ग्रामीण भागात दारोदारी पोहोचला अशा गमजा किंवा फुशारक्या मारणा-यांनी इतिहासाचा अभ्यास करावा. हिंदू विचार हा केवळ कर्मकांडांशी जोडलेला नसून संस्कृती आणि संस्कारांशी जोडलेला आहे.
खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. तर भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार राम सातपुते आणि विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी मनोगत व्यक्त केले. पुस्तकाचे मूळ लेखक शांतनू गुप्ता यांनी पुस्तक लेखनामागची भूमिका विशद केली. अनुवादक मल्हार पांडे यांनी पुस्तक अनुवादाची प्रक्रीया उलगडून सांगितली. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे संचालक ऋतुपर्ण कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. मंजिरी शहाणे यांनी सूत्रसंचालन केले.