Ravindra Dhangekar ( Marathi News ) : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि नंतर पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीपासून कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने आरोपीवर ३०४ हे कलम लावले होते, अशी माहितीही फडणवीसांनी दिली होती. मात्र फडणवीसांचा हा दावा पुणेकरांची दिशाभूल करणारा असून पोलिसांनी सुरुवातीला ३०४ अ हे कलम लावलं असल्याचा दावा करत काँग्रेस आमदार आणि लोकसभा निवडणुकीतील उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.
रवींद्र धंगेकर यांनी 'एक्स'वर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये कलम ३०४ चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पीआय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती," अशा शब्दांत धंगेकर यांनी पोलीस आणि गृहमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
"पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर ३०४ अ सोबतच ३०४ हे कलम लावण्यात आले. राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR कॉपी बदलल्याबाबत माहिती देण्यात आली नव्हती का? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन व बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का?" असा खोचक सवालही धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. तसंच "आपलं पुणे शहर वाचवण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे.अधिकारी-मंत्री तर निघून जातील पण शहराला लागलेली ही कीड आमच्या पुण्याच्या पिढ्यनपिढ्या बरबाद करण्याचे काम करेल," अशा शब्दांत धंगेकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
पोलिसांच्या भूमिकेचा बचाव करताना काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, " पोलिसांनी एफआयआर दाखल किती वाजता केला, त्याचं टायमिंग आहे. एफआयरमध्ये सुरुवातीलाच पोलिसांनी कलम ३०४ लावले आहे, ३०४ अ लावला असता तर आरोपीला सुटण्याचे सर्व पर्याय होते. मात्र पोलिसांनी तसं न करता आरोपीने केलेलं कृत्य गंभीर असल्याने त्याला अडल्ट गृहित धरून ३०४ कलम लावले. त्यामुळे याच्यावर राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं आहे. पण बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा धक्कादायक आहे आणि आम्हाला आश्चर्यचकित करणारा आहे, हे मी उघडपणे सांगतो," अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे.