देवेंद्र फडणवीस ६ जिल्ह्यांचे पालकमंत्री; त्यांना ते कसं पेलवणार, उपमुख्यमंत्र्यांना अजितदादांच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 05:43 PM2022-09-25T17:43:25+5:302022-09-25T17:43:54+5:30
मी पुण्याचा पालकमंत्री होतो, तर नाकीनऊ यायचे, त्यांना ते कसं पेलवणार हे माहिती नाही
बारामती : लोकांची कामे झटपट झाली पाहिजे. राज्य शासनाने पालकमंत्र्यांची नेमणुक केली हि गोष्ट चांगली आहे. पण काही मंत्र्यांकडे दोनपेक्षा जास्त जिल्ह्यांची जबाबदारी आहे. पालकमंत्र्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी वेळ द्यावा लागतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ जिल्ह्यांची जबाबदारी आहे, मी पुण्याचा पालकमंत्री होतो, तर नाकीनऊ यायचे, त्यांना ते कसं पेलवणार हे माहिती नाही, पण माझ्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला.
बारामती येथे आयोजित कार्यक्रमात पवार यांनी राज्य शासनाने पालकमंत्री नेमल्याबाबत समाधान व्यक्त केले. मात्र, पालकमंत्र्यांकडे असणारी जबाबदारी पाहता फडणवीस यांना हा टोला लगावला. अजित पवार पुण्याचा पालकमंत्री होता. ती जबाबदारी संभाळताना नाकीनऊ यायचे. मी आठवड्यातून एक दिवस पुण्याला देत असे. त्यावेळी सकाळी ७ पासुन काम सुरु करीत असे. कामाचा व्याप खुप असायचा.पालकमंत्रीबाबत अनेक जबाबदाऱ्या असतात. समित्या असतात. त्यावर महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात, असे पवार म्हणाले.
''शिंदे सरकार तुम्हाला संधी मिळाली आहे. कशी मिळाली, गद्दारी केलीय का नाही, आणखी काय केल माहित नाही. महाराष्ट्र हे सर्व पाहत आहे. पण तुम्ही जनतेची कामे करा, लोकांना आता कामाची अपेक्षा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.''