Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 02:54 PM2024-11-28T14:54:50+5:302024-11-28T14:55:16+5:30
ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा गोर गरिबांच संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा आहे
पुणे : महाराष्ट्र्रात महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा होती. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावे असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. तर अजित पवारांना मुख्यमंत्री करा अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी होती. अजित पवार आणि त्यांच्या पक्षानी देवेंद्र फडणवीस चालतील अशी भूमिका घेतली. एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबतच्या नावाचा तिढा आता सुटला आहे. अशातच आमदार छगन भुजबळ यांनी पुण्यात बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भुजबळ म्हणाले, ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा गोर गरिबांच संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा आहे. भाजपचाच मुख्यमंत्री होईल, देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षांमध्ये काम केलं आहे. याआधी ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. पण पक्षाने त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून काम दिलं त्यांनी काम केलं आणि झोकून काम केलं. मुख्यमंत्री होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना आमच्या शुभेच्छा आहेत. दादा मुख्यमंत्री झाले तरी चांगलं आहे. पण यावेळी भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत. म्हणून त्यांचा मुख्यमंत्री होईल फडणवीस झाले तरी आनंदच होईल.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर भुजबळ यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ईव्हीएम मशीन ने जिंकलो असेल. तर मला देखील एक लाख मत मिळायला हवी होती. माझं मताधिक्य वाढायला हवं होतं ते कमी झालं. मनोज जरांगे पाटील साहेब आदल्या दिवशी सकाळी दहा पासून रात्री दोन पर्यंत गावोगावी फिरले आणि जातिवाद पसरवण्याच काम केलं म्हणून माझं मताधिक्य कमी झालं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे. संजय राऊत टीका करतात याबाबत भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, पाच वर्ष त्यांना काही कामं नाही म्हणुन टीकाच करावी लागणार आहे.