पुणे : राज्यात सरकार स्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष निर्माण झाला असताना अमृता फडणवीस यांनी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खंबीर पाठराखण केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दोनशे टक्के देऊन काम केलेलं असून त्यांच्याइतके 'न भूतो न भविष्यती' कोण करु शकतं, असा थेट सवालच त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात त्या हजेरी लावली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मोकळेपणाने भाष्य केले.
त्या म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थिती जनतेला फडणवीस यांच्या इतका न्याय कोणीही देऊ शकत नाही. हे पार्टीचे वरिष्ठ नेते आणि जनताही ओळखून आहे . त्यामुळे विधानसभेत सर्वाधिक जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या आहेत. त्या दृष्टीनेच पुढील वाटचाल सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यात सरकार बनविण्यासंदर्भात घडामोडी सुरू आहेत. मात्र मी शिवसेनेला अपील करण्यास योग्य व्यकी नाही आणि माझं ते ऐकणार नाही अशा शब्दात त्यांनी राजकीय मध्यस्ती करण्यास नकार दिला. माञ सध्याच्या परिस्थितीत राज्याचे नेतृत्व करण्यासाठी भाजप सक्षम असल्याचे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत.