पुणे :पुणेमेट्रोचे काम थांबवणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नाही़ परंतु, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनीच पुणे मेट्रोचा डीपीआर चुकवला आहे़ त्यामुळेच १३१ वर्षांची परंपरा असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीची वैभवशाली परंपरा खंडित होणार आहे. याला तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार, महापालिकेतील सत्ताधारी पक्ष कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (prashant jagtap) यांनी केला आहे़ सप्टेंबर महिन्यात कोणत्या अधिकारात महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांनी संभाजी पुलावरील मेट्रो पुलाचे कामकाज थांबविले याचे उत्तरही द्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
विसर्जन मिरवणुकीला अडथळा ठरणाऱ्या संभाजी पुलावरील मेट्रो पुलाचे काम थांबवावे ही शहरातील गणेश मंडळांची मागणी होती़ त्याबाबत गेले तीन चार महिने आंदोलने सुरू असून, मंगळवारी (दि. २१) महापालिकेच्या आवारात गणेश मंडळांचे आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
या विषयावर पुणे महापालिकेच्या सभागृहात विस्तृतपणे चर्चा करून माध्यमांच्याद्वारे पुणेकरांना सत्य परिस्थिती समजावी अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली होती़ मात्र, पुणेकरांसमोर आपलं पितळ उघडं पडेल या भीतीने महापौरांनी सदस्यांना भाषण करण्याची परवानगी नाकारली. महापौरांनी अशी अहंकारी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, मनसे या पक्षाच्या सदस्यांनी महापौरांसमोरच ठिय्या मांडला. जवळपास तासभर चाललेल्या या गोंधळात मेट्रोचे कामकाज थांबवा अशी मागणी कोणीही केली नाही. पुणे शहराच्या विकासाला, पुणे मेट्रोच्या कामाला आमचा पाठिंबा आहे. मात्र पुणे शहराचा सांस्कृतिक वारसा गाडून त्यावर विकासकामांचे इमले बांधण्याचा भाजपचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही़.