पुणे : मी काल नागपूर येथे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला होतो. त्यामुळे दोन्ही भाषण मी ऐकले नाहीत. मात्र, रात्री शिंदे यांचे भाषण ऐकले. व्हिडिओ बघितले. त्यातून बीकेसीवरील गर्दीतून शिंदे यांनी हे दाखवून दिले की खरी शिवसेना नेमकी कोणाची आहे. शिवाजी पार्कच्या दुप्पट गर्दी तेथे होती. उध्दव ठाकरे यांच्या भाषणात शिमग्याच्या पलीकडे काहीच नव्हते. त्यावर सुज्ञ प्रतिक्रिया देत नाहीत, अशी खोचक टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुण्यात पत्रकारांशी बोलत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
खरी शिवसेना कोणती यावरून दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत झालेल्या दोन मेळव्यांवरून राजकीय घमासान सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचीच स्क्रिप्ट भाषणासाठी वापरली अशी टीका होत आहे. यावर आता भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ही स्क्रिप्ट भाजपची होती असे म्हणणाऱ्यांनी त्यांचाच स्क्रिप्ट रायटर बदलावा असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. उध्दव ठाकरे यांचे भाषण हे शिमगा होते आणि सुज्ञ लोक त्यावर प्रतिक्रिया देत नाहीत, अशी शेलक्या भाषेत टीका त्यांनी या वेळी केली.
'उध्दव ठाकरे हे कधीही मुख्यमंत्री म्हणून बोलले नाहीत'-
शिंदे काल जे बोलले ती भाजपचीच स्क्रिप्ट होती अशी टीका होत आहे याबाबत विचारले असता ते म्हणाले, "असे बोलणाऱ्या लोकांनी आता आपला स्क्रिप्ट रायटर बदलावा. एकनाथ शिंदे हे विकासावर बोलले, पुढे सरकार म्हणून काय करणार आहोत याबाबत ते बोलले. मात्र, यापूर्वी उध्दव ठाकरे हे कधीही मुख्यमंत्री म्हणून बोलले नाहीत. ते पूर्णवेळ पक्षप्रमुख म्हणूनच बोलले."
'सावरकरांना शिव्या दिल्याने आज ही स्थिती'-
शिंदे माझ्यासोबत बसलेले असताना त्यांना झेंडा शिवसेनेचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा असे का वाटले नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती, यावर फडणवीस म्हणाले, "अजित पवार काय बोलले मला माहित नाही पण मूळ शिवसेनेचा विचार बाजूला ठेऊन सावरकरांना शिव्या द्यायच्या, दाऊदच्या हस्तकांसोबत बसल्यानेच ठाकरे यांची आज ही अस्वस्था झाली."