पुणे: बदलापूर व मालवण येथील प्रकरणांमधील संशयित विशिष्ट पक्षाबरोबर संबधित आहेत. त्यांचा तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला याचा परस्परांशी काही ना काही संबध आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
पक्षाच्या बैठकीसाठी पटोले बुधवारी पुण्यात आले होते. बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, बदलापूर येथील अत्याचार प्रकरण व मालवणातील शिवछत्रपतींचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांमध्ये पडणे हे दोन्ही प्रकार गंभीर आहेत. छत्रपतींचा पुतळा पडणे हा तर महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि अस्मितेला धक्काच आहे.
मालवणातील पुतळ्याचे काम नवोदित शिल्पकाराला देण्यात आले. तो फरार आहे. बदलापूर मध्ये आरोपी सापडला, पण तो प्रकार ज्या शाळेत घडला, ज्या संचालकांनी प्रकरण धडपण्याचा प्रयत्न केला त्या शाळेचे संचालक फरार आहेत. पोलीसांना ते सापडत नाहीत हे आश्चर्य आहे. एका पक्षाशी संबधित हे लोक आहेत. फडणवीस व रश्मी शुक्ला आणि या पक्षाशी संबधित संशयित आरोपी यांचे कनेक्शन आहे. त्याशिवाय आरोपी फरार होऊ शकत नाहीत. पोलीसांनी या दिशेने तपास करावा, त्यातून हे संबध उघडकीस येतील नवोदित शिल्पकाराला काम देण्यासाठी कोणी दबाव आणला व शाळेच्या संचालकांना कोण पाठीशी घालते आहे हे यातून उघड होईल असे पटोले म्हणाले.
अशा गोष्टींवर बोलणे म्हणजे राजकारण करणे नाही. सत्ताधार्याकडून विरोधकांवर असा आरोप होतो आहे, तो चुकीचा आहे. विरोधकांना त्यांची भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार आहे असे पटोले म्हणाले.