पुणे : ‘पुणे शैक्षणिक, औद्योगिक हब आहे. शहराची वाढती लोकसंख्या, गावांची संख्या लक्षात घेऊन शासन पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याकरिता नवीन स्राेत निर्माण करण्यासाठी काम करीत आहे. शहराला कुठल्याही परिस्थितीत पाणी कमी पडू दिले जाणार नाही. पुण्यातील पाणी वितरण समान करण्यासाठी ‘समान पाणी वाटप योजने’चे काम सुरू असून, ही योजना पूर्ण करण्यावर शासनाचा भर आहे. पाण्याची होणारी गळती रोखून शहराला पर्याप्त पाणी उपलब्ध करून देण्यात येईल,’ असे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.
पुणे शहरातील पाणीपुरवठ्याबाबत सदस्य रवींद्र धंगेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेच्या उत्तरात माहिती देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे शहराची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता खडकवासला ते फुरसुंगी बोगदा करण्यात येत आहे. यामधून २ टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. खडकवासला कालवा नूतनीकरणातून १.२५ टीएमसी, जुना मुठा कालवा अशा सर्व उपाययोजनांमधून ५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच नदी सुधार योजनेंतर्गत एसटीपीची (सीवेज ट्रीटमेंट प्लँट) कामे करण्यात येत आहेत. यामधून पाण्याचा पुनर्वापर करण्यात येईल.
तरतुदीपेक्षा पुणे शहरात पाण्याचा वापर दुप्पट
एसटीपीच्या ५० किलोमीटर परिसरात असलेल्या उद्योगांना पुनर्वापर केलेले पाणी घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. विकासकांनी रहिवासी संकुले तयार केल्यानंतर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठा न करणाऱ्या विकासकांना पाणी पुरवठा त्यांच्या खर्चाने करण्याबाबत सूचना देण्यात येतील. पुणे शहराची ७२ लाख लोकसंख्या नवीन २३ गावांसह गृहीत धरण्यात आली आहे. या लोकसंख्येला पुणे शहरासाठी पाण्याची तरतूद ११.७ टीएमसी असून मंजूर पाणी १४.६१ टीएमसी आहे. जवळपास ३ टीएमसी पाण्याची तरतूद अधिक आहे. मात्र वापर हा २०.८७ टीएमसी आहे. तरतूद केलेल्या पाण्यापेक्षा पुणे शहरात पाण्याचा वापर हा दुप्पट आहे. यावरून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर आहे.
पाण्याची गळती ४० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर येणार
समान पाणी वाटप योजनेच्या माध्यमातून गळती होणाऱ्या ४० टक्के पाण्याची बचत करण्याचा प्रयत्न आहे. या योजनेचे ४० टक्के झोनमधील काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाण्याची गळती ४० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर येणार आहे. या बचतीतून २० टीएमसी वापराचे पाण्यातील ४ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
लवादाच्या निर्णयानुसार कार्यवाही करू : देवेंद्र फडणवीस
पावसाळी अधिवेशनात आमदार माधुरी मिसाळ आणि रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अतिरिक्त पाणी वापराबद्दल कायद्यानुसार दंड केला आहे. परंतु, तो याआधीही वसूल केलेला नाही. मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी घेण्याबाबत लवादाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल. भिलारेवाडी, कात्रज येथे अर्धा टीएमसी पाणी उपलब्ध होत असेल, तर ते घेणे शक्य आहे का? यासाठी महापालिका आणि पाटबंधारे विभागाला तातडीने सर्वेक्षण करण्यास सांगून कार्यवाही करू, असेही फडणवीस म्हणाले.