मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावर अमृता फडणवीस यांची मतं स्वतंत्र आहेत. त्यांचे निर्णय त्या स्वत: घेतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अमृता फडणवीस हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे निर्णय त्या घेतात. त्यांची मतं स्वतंत्र आहेत. मात्र, काही राजकीय पक्ष त्यांना खालच्या दर्जापर्यंत ट्रोल करतात. काहीवेळा त्यांना त्याचे परिणामही भोगावे लागतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याशिवाय, अमृता फडणवीस राजकारणात येणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना केला असता ते म्हणाले, 'जितके मला माहित आहे, त्यानुसार त्या कधीही राजकारणात येतील असे वाटत नाही.'
दरम्यान, माझे आडनाव गांधी आहे, सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात म्हटले होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यासारखे काम करावे लागते. त्यानुसार काम केले तरच माणसं मोठी होतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली होती.
देवेंद्र फडणवीसांच्या या ट्विटला रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी फक्त 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही. फक्त आपले कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करावे लागते अशी थेट टीकाच उद्धव ठाकरे यांच्यावर केली. त्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. अमृता फडणवीसांच्या या टीकेला शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहे. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो ठाकरे ठाकरेच असे म्हणत अमृता फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
(खरंय देवेंद्र! ...म्हणून कोणी 'ठाकरे' होत नाही; अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका)
(सत्तालोभी आनंदीबाईंमुळे राघोबा खलनायक ठरले; अमृता फडणवीसांवर शिवसेनेचा 'बाण')