पुणे - ‘महाविकास आघाडीचा पोपट केव्हाच मेला आहे, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही कळून चुकले आहे; पण हा पोपट जिवंत आहे, हे आपल्या कार्यकर्त्यांना कळावे, म्हणून आघाडीचे नेते बोलत आहेत,’ असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. पुण्यातील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका करताना वज्रमुठ कुठेही नसल्याचं म्हटलं. आता, देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. यावेळी, त्यांनी फडणवीसांना मिश्कील टोला लगावला.
कर्नाटकच्या निकालानंतर कार्यकर्त्यांना बुस्ट देण्यासाठी केलेलं हे भाषण आहे, असं बोलावं लागतो. त्यांच्याजागी आम्ही असतो तरी असेच भाषण केले असते. पुढं राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका आहेत. म्हणून केलेलं ते राजकीय भाषण होतं, ते फार गंभीरतेनं घ्यायची गरज नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली.
पोपट मेला, अरे दाखवा तरी कुठं पोपट मेलाय तो. उगं त्यांनी म्हणायचं पोपट मेला, आम्ही म्हणायचं मैना मेली, कुणी म्हणायचं मोर मेला. कुणी मेलेलं नाही, सगळं काही जनतेच्यासमोर आहे. जनतेच्या मनात जे असतं ते जनता करून दाखवते. जनतेचा तो अधिकार आहे, जो संविधानाने त्यांना दिलेला आहे. त्यामुळे, पोपट मेला, पोपटीन मेली असं म्हणण्याचं काही कारण नाही. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही. काँग्रेसला सुद्धा पराभव पत्कारावा लागला आहे, असे म्हणत अजित पवार यांनी फडणवीसांच्या भाषणावर टोला लगावला.
काय म्हणाले होते फडणवीस
'महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला आधीच तडे गेले आहेत. कोणी कसे बसायचे, कुठे उभे राहायचे, कोणी बोलायचे याबाबत वाद सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिले आहे. त्यामुळे आम्ही त्याबद्दल बोलण्याची गरज नाही,' अस फडणवीस यांनी म्हटले होते. तसेच, महाविकास आघाडीचा पोपट केव्हाच मेला आहे, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही कळून चुकले आहे. पण, हा पोपट जिवंत आहे, हे आपल्या कार्यकर्त्यांना कळावे, म्हणून आघाडीचे नेते बोलत आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले होते.