पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (narendra modi) देशात गरीब कल्याणाचा अजेंडा राबवून मोठे परिवर्तन केले आहे. राष्ट्रवादाच्या शाश्वत विचारानेही देश पुढे जाईल. आपला भारत विश्वगुरू झाला पाहिजे हे आपलं स्वप्न आहे. आपल्या देशाला जगावर राज्य करायचे नाही तर विश्वाला विचार द्यायचा आहे. लवकरच विचार देणारा भारत निश्चितपणे तयार होऊ शकेल, त्यासाठी भाजपा हे उपकरण असेल, असं मत देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी माडंले आहे. मंगळवारी (१९ एप्रिल) पुण्यात ‘भाजपा : काल आज आणि उद्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत फडणवीस होते.
भारत देशात जन्म आणि भाजप पक्षात काम करण्याची संधी यापेक्षा मोठे जीवनात काहीच असू शकत नाही. हे भाग्य आम्हाला सर्वांना मिळालं. त्याबद्दल मी समाधानी असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.
कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध पेटले असताना असताना अमेरिकेने दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारताचे परराष्ट्रमंत्री अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात की, आम्हाला भारताचं हित पाहायचं आहे, अमेरिकेचं हित पाहायचं नाही. दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात रशियाला देखील असं वाटतं की रशिया आणि युक्रेनमध्ये कोणी मध्यस्थी करू शकत असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात. यावर तोडगा काढण्याची ताकद मोदी यांच्यामध्येच आहे.