पुणे - भाजप नेत्या आणि आमदार गिता जैन यांनी काल महापालिकेतील एका ठेकेदारी अभियंत्याला मारहाण केली. त्यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. विरोधी पक्षाकडून हा सत्तेचा माज असल्याची टीका सरकार आणि भाजप आमदारांवर केली जात आहे. यासंदर्भात आमदार गीता जैन यांनी स्पष्टीकरण देताना मी कुठेही चुकीचं केलेलं नाही. याउलट संबंधित अभियंत्यांनी चुकीच्या पद्धतीने बिल्डरच्या साांगण्यावरुन कारवाई केल्याचं म्हटलं. याबाबत, उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार गीत जैन यांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी संयम बाळगला पाहिजे. कधीतरी संताप होऊ शकतो, एखाद्या गोष्टीत राग अनावर होऊ शकतो. तरीही लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणं हेच योग्य आहे, असे स्पष्ट शब्दात फडणवीस यांनी म्हटलं. फडणवीसांनी आमदार जैन यांच्या कृतीचं कुठलंही समर्थन केलं नाही. पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी, राज्यात ईडीकडून होत असेलल्या छापेमारीवरही त्यांनी भाष्य केलं.
आमदार जैन यांचा व्हिडिओ व्हायरल
आमदार गीता जैन यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेक्यावरील कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांची कॉलर धरून कानशीलात लगावली होती. येथील परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या राहत्या घरावर तोडक कारवाईसाठी या अभियंत्यांच्या नेतृत्त्वात पथक गेले होते. त्यामुळे, पीडित कुटुंबाने आमदार गीता जैन यांच्याकडे धाव घेतली होती. त्यावेळी, आमदार जैन यांनी अभियंत्यास सरकारी नियम आणि माणुसकी शिकवत चांगलाच धडा शिकवला. त्या घरात लहान मुले आहेत, कुटुंब राहात आहे, आणि तुम्ही घर तोडायचं काम करता, तुम्ही माणसं आहात की राक्षस असं म्हणत आमदार जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी कानउघडणी केली होती. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
ईडी छापेमारीवर काय म्हणाले फडणवीस
मुंबई महापालिकेमधील कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आला. त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार झाल्या होत्या. लोकांच्या जिवाशी अक्षरश: खेळण्यात आले. पुण्यात तर एका पत्रकाराचाच मृत्यू झाला. त्यामुळे यासंदर्भातील चौकशी चालली आहे. ही चौकशी कुठपर्यंत पोहोचली, या छाप्यात काय मिळालं आहे हे ईडी सांगू शकेल. मला माहिती नाही. ज्या लोकांचे कनेक्शन असतील त्यांची चौकशी सुरु असेल, याबाबत अधिकृतपणे ईडीचे अधिकारीच माहिती देऊ शकतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ईडीकडून एकाचवेळी 15 ठिकाणी छापेमारी सुरु आहे. शिवसेनचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेले सुजीत पाटकर, आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचाही समावेश आहे. यावरुन आणखी किती लोकांची चौकशी सुरु आहे, असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.