पुणे : पुणे मेट्रोच्या ट्रायल रनचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, आता पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळींकडून सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनंतर अमृता फडणवीसांनी देखील राज्य सरकारला पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून जोरदार टोला लगावला होता. पण आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुणे मेट्रो प्रकल्पाची पाहणी करणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तसेच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह मनसेने देखील कंबर कसली असली आहे. वरिष्ठ नेते मंडळींचे पुणे आणि पिंपरी चिंचवड दौरे, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यामुळे विकासकामांच्या धर्तीवर आगामी काळात पुण्यातील राजकारण चांगलेच तापणार आहे.
देवेंद्र फडणवीस हे शनिवारी ( दि. ६) पुणे दौऱ्यावर येणार असून यावेळी ते मेट्रो प्रकल्पाची शिवाजीनगर येथील सिव्हील कोर्ट येथे पाहणी करणार आहे. यावेळी ते पुणे मेट्रोच्या ट्रायल रनवरुन सुरु असलेल्या श्रेयवादावर भाष्य करण्याची शक्यता आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच पुणे मेट्रोच्या 'ट्रायल रन'चं उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंदक्रांत पाटील यांनाही निमंत्रण न दिल्यामुळे चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. तसेच पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून आघाडी सरकार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडत आहे.
चंद्रकांत पाटलांनी पुणे मेट्रोला सुनावले होते खडे बोल
पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्वप्रथम मेट्रो कंपनीला खडे बोल सुनावले होते. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोचा आम्ही निषेध करतो. अशा प्रकारे दबावाखाली काम करायचं असेल तर आम्हालाही दबाव टाकता येतो. मोदींनी सर्व परवानग्या दिल्या, केंद्राने ११ हजार कोटी दिले आणि मोदींचा साधा फोटोही नाही ? आम्ही काय फुकटचं मागतोय का? तुम्हाला सगळं फुकट हवंय. माझ्या मतदारसंघात कार्यक्रम घेऊन मी नाही तिथे? यापुढे असं केलं तर खपवून घेणार नाही असा गर्भित इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला होता.
काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात, अमृता फडणवीसांचा निशाणा
पुण्यात अमृता फडणवीस एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी चालू घडामोडींवर आपली रोखठोक मतं व्यक्त केली. तसेच पुणे मेट्रोच्या श्रेयवादावर भाष्य करतानाच राज्य सरकारच्या कामकाजावरही जोरदार टीका केली. पुणे मेट्रोच्या 'ट्रायल रन' उद्घाटनावरून अमृता फडणवीसांनी '' काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात'' अशा शब्दात महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता.
भाजप-राष्ट्रवादीत रंगले होते 'पोस्टर वॉर' भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पावधी सरकारच्या काळात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात चांगलेच 'होर्डिंग वॉर' रंगले होते. या 'होर्डिंग्ज बाजी'मधून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांची जोरदार हवा केली होती. मात्र, आता या होर्डिंग युद्धात शिवसेनेने उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात 'होर्डिंग वॉर' पुन्हा एकदा चर्चेत आले होते.