पुणे: : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. गेल्या पाच वर्षात आर्थिक शिस्त मोडण्याचे काम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
नुकताच कॅगचा रिपोर्ट आला आहे. 66 हजार कोटींचा हिशेब प्राप्त झाला नसल्याचे कॅगने म्हटले आहे. आर्थिक शिस्त मोडण्याचे काम फडणवीस सरकारने केले आहे, राज्यात असे कधी झाले नव्हते. मात्र, आता याबाबत सखोल चौकशी व्हावी आणि वस्तुस्थिती लोकांसमोर यावी, यासाठी आताच्या सरकारने विशेष समिती नेमून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी सुद्धा यावेळी शरद पवार यांनी केली आहे.
दरम्यान, एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह होते. त्यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आला. मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणून काहींना आत टाकण्यात आले. पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे शरद पवारांनी केली आहे.
याशिवाय, देशातील सध्यस्थिती, नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसीबाबतही शरद पवार यांनी भाष्य केले. यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशात सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.