पुणे - राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुमारे 70 जणांवर मंगळवारी 'इडी'तर्फे गुन्हा दाखल करण्यात आला. याचा निषेध म्हणून पुण्यात राष्ट्रवादीने जोरदार आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली.
राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटपात तब्बल 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा अहवाल नाबार्डने दिल्यावर सुरेंद्र अरोरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यात शरद पवार यांचाही समावेश झाल्याचे समजते. याच विषयावर मंडईतील टिळक पुतळ्याजवळ राष्ट्रवादीने आंदोलन केले. या आंदोलनात 'नरेंद्र-देवेंद्र चोर है' अशा घोषणा देण्यात आल्या. मात्र त्यानंतर अचानक कार्यकर्त्यांनी जवळ असणाऱ्या महात्मा फुले मंडई पोलीस चौकीवर चढून घोषणा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले की, उदयनराजे यांना पक्षात घेतल्यावर भाजपला आकाश ठेंगणे झाले होते. मात्र, पवार यांच्या सभेला साताऱ्यात मिळणारा प्रतिसाद बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपच्या या कृतीचे उत्तर जनता 21 ऑक्टोबरला मतदानातून देईल, असेही ते म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश कामठे म्हणाले की, ' युवकांचा पवार यांना प्रतिसाद भाजपला अनपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी राजकीय सुडापोटी गुन्हा दाखल केला.मात्र यामुळे त्यांना युवकांचा अधिक प्रतिसाद मिळेल असे वाटते'.