लोकमत न्यूज नेटवर्कपाटेठाण : केंद्रीय लोकसेवा, राज्यसेवा व इतर स्पर्धा परीक्षा हे साध्य नसून साधन आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यशप्राप्ती करायची असेल तर युवकांनी नियोजनपूर्ण अभ्यास, जिद्द, कठोर मेहनतीबरोबरच, धैर्य आवश्यक असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. पिलाणवाडी (ता. दौंड) येथील भाऊसाहेब पोपट डुबे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१६ मध्ये घेतलेल्या परीक्षेत पोलीस खात्यातर्गंत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना बोलत होते. यावेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले, युवकांनी स्पर्धा परीक्षा या केवळ नोकरी करण्यासाठी न देता लोकसेवा करण्याची संधी मिळते, या उद्देशाने देणे गरजेचे असून यासाठी जिद्द, चिकाटी, वृत्तपत्रांचे वाचन, सराव, चालू घडामोडींचे आकलन, वेळेचे नियोजन तसेच नशीबावर विश्वास ठेवण्यापेक्षा मेहनतीवर अधिक भर दिल्यास निश्चितपणे यशप्राप्ती होण्यास वेळ लागणार नाही. राहू येथील कैलास विद्यामंदिर विद्यालयातून केंद्रीय लोकसेवा, राज्य सेवांमध्ये यश संपादन करत अनेक विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवला असून परिसरात मध्यवर्ती ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. यावेळी माजी आमदार रंजना कुल, भीमा-पाटसचे संचालक विकास शेलार, माजी उपसरपंच गणेश चव्हाण, रासपाचे तालुका उपाध्यक्ष सागर डुबे, सुरेश डुबे उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा साध्य नसून साधन आहे : राहुल कुल
By admin | Published: May 26, 2017 5:42 AM