विशेष प्रतिनिधीमुंबई : पत्रकार पूनम अगरवाल आणि शत्रूशी मुकाबला करताना दोन्ही पाय व एक हात गमावलेला एक माजी जवान दीपचंद काश्मीर सिंग यांच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी नोंदविलेले लष्करी गुपिते फोडणे व रॉय मॅथ्यु या लष्करी जवानास आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाने हास्यास्पद ठरवून रद्द केले आहेत.लान्स नायक नरेश कुमार अमित यादव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अगरवाल व दीपचंद यांच्याविरुद्ध हे गुन्हे २७ मार्च २०१७ रोजी नोंदविले होते. या दोघांनी केलेल्या याचिका मंजूर करून न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने गुन्हे रद्द केले.दीपचंद देवळाली कॅम्पमध्ये एक कॅन्टीन चालवायचे. अगरवाल ७ फेब्रुवारी २०१७ रोजी देवळाली कॅम्पमधील हेग लाइन, महेंद्र एन्क्लेव्हमधील सार्वजनिक उद्यानात गेल्या. तेथे त्यांनी दीपचंद यांच्या मदतीने काही लष्करी जवानांच्या छोटेखानी मुलाखती व्हिडीओ कॅमेऱ्याने रेकॉर्ड केल्या. लष्करात जवानांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व्यक्तिगत हरकामे नोकर म्हणून काम करायला लावण्याची जी प्रथा रूढ आहे, त्यासंबंधी जवानांशी संभाषण करून अगरवाल यांनी ते टेप केले होते. नंतर हा व्हिडीओ यूट्युब व फेसबूकवर प्रसिद्ध करण्यात आला होता.जवानांचे संभाषण सोयीसुनार आणि विकृतपणे संपादित करून व्हिडीओ प्रसिद्ध केल्याने भारतीय लष्कराची अप्रतिष्ठा झाली. आता ‘कोर्ट मार्शल’ करून आपल्याला सैन्यातून हाकलून दिले जाईल, या शक्यतेने अगरवाल यांच्याशी बोललेले जवान भयभीत झाले. याच भीतीपोटी रॉय मॅथ्यु या एका जवानाने आत्महत्या केली, अशी लष्कराची फिर्याद होती. अगरवाल व दीपचंद यांच्या या कृतीने देशाच्या सुरक्षेला व सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला, असा आरोप करून या दोघांवर लष्करी गुपिते फोडणे व आत्महत्येस प्रवृत्त करणे यासह अन्य गुन्हे नोंदविण्यात आले होते. हा देश व लष्कराविरुद्ध रचलेल्या व्यापक कटाचा तर भाग नाही ना, याचाही तपास करणे गरजेचे आहे, असेही पोलिसांचे म्हणणे होते.‘फिर्याद शुद्ध वेडेपणाची’संबंधित व्हिडीओ पाहून आणि फिर्यादीसह सर्व रेकॉर्डचा बारकाईने अभ्यास करून खंडपीठाने नमूद केले की, यामुळे लष्कराची अप्रतिष्ठा झाली किंवा देशाची सुरक्षा धोक्यात आली हे म्हणणे शुद्ध वेडेपणाचे आहे. एकही गुन्हा नोंदविण्यास सकृतदर्शनी कोणताही आधार नाही. याचा तपास पुढे सुरू ठेवण्याने आरोपींना निष्कारण त्रास देण्याखेरीज काही निष्पन्न होणार नाही. न्यायालयाने असेही म्हटले की, रॉय मॅथ्यु या जवानाने आठवडाभरानंतर आत्महत्या केली. त्याला अगरवाल व दीपचंद यांनी प्रवृत्त केले असे म्हणणे हा विनाकारण बादरायण संबंध जोडणे आहे.