नीरा : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील भक्ती आणि शक्तीची प्रेरणा देणारी श्री ज्योतिर्लिंगाची यात्रा उत्साहात साजरी झाली. बाभळीच्या काटेरी ढिगावर मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने भाविकांनी उड्या घेतल्या. काटेरी ढिगावर लोळणारे भक्त पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येत राज्यासह परराज्यांतील शिवभक्त उपस्थित होते. १२ दिवस चाललेल्या काटेबारस यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता झाली.
मंदिरासमोर मानक-यांनी डोक्यावर बाभळीच्या काट्यांचे फास जमा केले. ट्रकभर काटेरी फास गोलाकार पद्धतीने मांडले गेले. एव्हाना मानाची काठी व दोन्ही पालख्या मंदिराकडे मार्गस्थ झाल्या. काटेरी ढिगाभोवती पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्याबरोबर शिवभक्तांनी शक्ती आणि भक्तीच्या जोरावर ‘हर भोले हर हर.... महादेव’च्या जयघोषात काटेरी फासावर उड्या मारून देवाप्रति आपली श्रद्धा व्यक्त केली. सुमारे दीड तासात ७० ते ७५ भक्तांनी काट्यांच्या ढिगांवर मुक्तपणे लोळण घेतली.