बारामती : चारधाम यात्रेसाठी निघालेल्या बारामती येथील भाविकांवर काळाने घाला घातला. या भाविकांच्या बोलेरो गाडीचा गुरुवारी(दि १२) पहाटे नोएडाजवळ अपघात झाला. बारामतीतील चार, तर कर्नाटक येथील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती समजताच बारामतीवर शोककळा पसरली आहे.
बस आणि बोलेरो गाडीतून महाराष्ट्रातील एकूण ५० प्रवाशी निघाले होते. यापैकी बोलेरो गाडीत सात जण प्रवास करीत होेते. काल रात्री वृंदावन या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. आज पहाटे साडेचार वाजता ते दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी नोएडा नजीक जेवर या गावाजवळ डंपरला बोलेरो गाडीने मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याचे समजते. यात एकूण पाचजणांचा मृत्यु झाला. बारामतीच्या चौघाजणांचा मृत्यु झाला.
यामध्ये बारामतीतील चंद्रकांत नारायण बोराडे, सुवर्णा चंद्रकांत बोराडे हे दांपत्य, रंजना भरत पवार व मालन विश्वनाथ कुंभार, अशी या चौघाजणांची नावे आहेत. यामध्ये रंजना पवार या उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे खासगी स्वीय सहायक सचिन पवार यांच्या मातोश्री आहेत. याशिवाय स्वयंपाक करणाऱ्या निवंतण मुजावर (रा.चिकोडी,कर्नाटक) या महिलेचा मृत्यु झाला आहे. तसेच सुनीता राजु गस्ते(बेलगाव,कर्नाटक ) या जखमी झाल्या आहेत. अपघातग्रस्त गाडीचे चाालक नारायण कोळेकर(रा.फलटण) हे गंभीर जखमी आहे.
गाडीमधील आणखी दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. आज पहाटे साडेपाचच्या दरम्यान हा गंभीर अपघात झाल्याची माहिती आहे. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप या प्रवाशांनी अपघातग्रस्तांना अपघात झाल्यानंतर मदत केली. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघाताची दखल घेतली आहे. तसेच अपघात ग्रस्तांना मदतीसाठी दिल्लीमध्ये यंत्रणेबरोबर पवार यांनी स्वत: संपर्क साधला आहे.