शेलपिंपळगाव : ऐशी भानोबाची ख्याती ! प्रतिवर्षी येती उत्सवासी !! भक्तिभावे पुजता त्यासी ! दु:ख दैन्य निवारी !!असाच प्रत्यय श्री. क्षेत्र कोयाळी भानोबाची (ता. खेड) येथे हजारो भाविक भक्तांनी अनुभवला. श्री. भानोबाच्या उत्सवानिमित्त कोयाळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय आयोजित उत्सवामध्ये पहिल्या व दुसऱ्या दिवशी खेळले जात असलेले देव आणि दानवांचे युद्ध प्रत्यक्ष स्वता:च्या नयनांनी पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकभक्तांनी हजेरी लावली होती. कोयाळीत श्री. भानोबा देवाच्या स्वागतासाठी गावातील ग्रामस्थांनी जय्यत तयारी करून मोठ्या उत्साहात देवाचे स्वागत केले. यावेळी देवाच्या स्वागत सभारंभाला नागरिकांची संख्या मोठी लक्षणीय होती. कोयाळी येथे रविवारी आणि सोमवारी देव-दानावांमध्ये रंगलेले हे युद्ध पाहण्यासाठी तसेच श्री. भानोबाच्या दर्शनासाठी दोन दिवसात हजारो भाविकांनी हजेरी लावली. तत्पर्वी, आज पहाटे श्री. भानोबा देवाची विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर देवाचा पोवाडा घेण्यात आला. सकाळी साडे अकरा ते एक यावेळेत देव-दानव युद्ध झाले. देवाची महारती घेऊन देवाच्या दर्शनाला दर्शनबरीतून सुरुवात झाली. उत्सवात कुस्त्यांचा जंगी आखाडा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील नामांकित मल्लांनी आखाड्यामध्ये सहभाग घेतला होता. उत्सवात मनोरंजन कार्याक्रमची मोठी रेलचेल ठेवण्यात आली होती.
तीन दिवसीय चाललेला हा उत्सव पार पडण्यासाठी कोयाळी-भानोबाच्या देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच सर्व ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभले. यात्रेदरम्यान आळंदी व चाकण पोलीस ठाण्याअंतर्गत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.