लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांसोबतच बाधित गावांमध्ये कोरोनाबाधितांचा शाेध घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे धडक सर्वेक्षण राबिवण्यात येत आहे. १३ जुलैपासून सुरू झालेल्या या मोहिमेत ४०० गावातील लक्षणेविरहित जवळपास ७५ हजार ५८९ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात तब्बल १ हजार ८८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हे सर्वेक्षण रुग्णबाधितांचा वेग कमी होईपर्यंत राबविण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्याचा रुग्णबाधितांचा दर ५.४ आला असून शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील निर्बंध कधी उठणार या प्रतीक्षेत नागरिक आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा दर आटोक्यात येत नव्हता. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण जास्त आढळत होते. अनेक रुग्ण हे लक्षणेविरहीत असल्याने ते सर्वसामान्य नागरिकांत मिसळत असल्याने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. जिल्ह्यातील जवळपास ११३ गावे ही हॉटस्पॉट तर ३०० हून अधिक गावांत एक तरी बाधित व्यक्ती होती. यामुळे जिल्हा परिषदेने १३ जुलैपासून या गावात धडक सर्वेक्षण हाती घेतले आहे. हजाराहून अधिक आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे ही मोहीम सुरू आहे. मोहीम सुरु झाल्यापासून आतापर्यंत ७५ हजार ५८९ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील १ हजार ८८८ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्याचा बाधित दर ५.४ इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनही कोरोना आटोक्यात येत नाही. हे लक्षात आल्यानंतर हॉटस्पॉट गावात आणि बाधित गावात सर्वेक्षण मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कोरोनाबाधित गावांमध्ये घरोघरी जाऊन किमान एका व्यक्तीची कोरोना चाचणी केली जात आहे. यासाठी आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य सहायक, व आशा स्वयंसेविका यांचे पथक काम करत आहे. एका पथकात दोन जणांचा समावेश असून नमुना घेणे व त्याची एसआरएफ आयडी जनरेट करण्याच्या सूचना केल्या आहेत.
सुपर स्प्रेडर सर्वेक्षण व नमुना तपासणीमध्ये एमआयडीसी, कारखाने क्षेत्रातील कामगार, मजूर, बँक कर्मचारी तसेच सामाजिक पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे.
चौकट
ग्रामीण भागात आतापर्यंत २१ लाख ११ हजार ५४७ जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. ७७० गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात सध्याच्या घडीला ५ हजार २४० क्रियाशील रुग्ण आहेत. तर २ हजार ४२५ क्रियाशील कन्टेमेंन्ट झोन आहेत.
चौकट
नगरपालिका हद्दीतील सक्रिय रुग्णसंख्या
तळेगाव १८७, बारामती १३७, लोणावळा १२९, सासडव ४८, चाकण ४५, दौंड ४२, इंदापुर ३९, वडगाव मावळ ३८, जुन्नर २४, आळंदी २३, भोर २३, शिरूर १९, राजगुरूनगर १८, जेजुरी १०.
चौकट
हॉटस्पॉट गावांची संख्या आली १०० वर
जिल्ह्यात हॉटस्पॉट गावांची संख्या १०० वर आली आहे. या गावात १० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. सर्वाधिक हॉटस्पॉट गावे जुन्नर तालुक्यात आहेत. जवळपास २१ गावांत १० पेक्षा जास्त रूग्ण आहेत. तालुकानिहाय हॉटस्पॉट गावे : जुन्नर २१, आंबेगाव ११, पुरंदर ११, शिरुर १०, हवेली ९, खेड ९, बारामती ९, मावळ २, दौंड ७, इंदापुर २, मुळशी २, भोर २, वेल्हा ०.