धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथे भर दिवसा एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. ३०) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या गोळीबारात सराईत गुन्हेगार ओंकार तानाजी लोहकरे (वय १९, वर्षे, रा. जाधवनगर, रायकर मळा, धायरी, पुणे) याचा मृत्यू झाला आहे.
पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार लोहकरे हा मित्र सागर ढेबेसोबत दुचाकीवर पाठीमागे बसून रायकर मळ्याकडून धायरी गावाच्या दिशेने निघाला होता. दरम्यान, तो सिल्व्हर बर्च हॉस्पिटलजवळ आला असता पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी ओंकार लोहकरे याच्या पाठीवर गोळीबार केला.
यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ओंकार व विधिसंघर्षित बालक यांचे बालसुधारगृहात असताना वाद झाले होते. त्यावरून त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. मात्र, भर दिवसा गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ओंकार लोहकरे हा तरुण सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.