तीनशे कुटुंबांची शपथ : दोनशे कुटुंबांनी अर्जही भरले
पुणे : अनेकांना अवयवदान करण्याची इच्छा असते. मात्र, त्यासाठी भरावा लागणारा अर्ज, प्रक्रिया लांबलचक असल्याच्या समजातून किंवा केवळ योग्य माहिती न मिळाल्याने अनेक जण पुढाकार घेत नाहीत. ही प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीतर्फे अवयवदानाचा अर्ज भरण्यासाठी क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुरंदर तालुक्यातील धालेवाडी गावाने या चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गावातील तब्बल ३०० कुटुंबांनी मरणोत्तर अवयवदानाची शपथ घेतली आहे. त्यांपैकी २०० हून अधिक कुटुंबांनी पहिल्याच दिवशी अर्ज भरले.
मोबाईलवरून क्यूआर कोड स्कॅन केल्यावर थेट संकेतस्थळावर जाऊन सोप्या पद्धतीने अर्ज करणे शक्य झाले आहे. प्रक्रिया सोपी असल्याने जून ते आॅगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीत २०० हून अधिक जणांनी अर्ज केले आहेत. विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या पुणे शाखेच्या मार्गदर्शनाखाली धालेवाडी गावातील युवा सारथी फाउंडेशनने ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील प्रत्येकाचा मरणोत्तर अवयवदानाचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले म्हणाल्या, ‘अवयवदानाबाबत आजही समाजात जनजागृतीची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक व्यक्तींनी चळवळीला बळ देण्यासाठी आपणहून पुढाकार घेतला आहे. युवा सारथी फाउंडेशनने सातत्याने पाठपुरावा करून हा उपक्रम यशस्वी केला आहे. धालेवाडी ग्रामस्थांनी त्याला दिलेला प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणारा आहे.’
--------------------
मरणोत्तर अवयवदानाबाबत प्रबोधन करताना ग्रामस्थांना अर्ज भरण्यासाठी तयार करणे हे आव्हानच होते. कुटुंबातील सुशिक्षित, जाणत्या सदस्यांना मदतीला घेऊन ते आव्हान पेलले. साथरोगाच्या काळात निरोगी जीवन या गोष्टीचे महत्त्व सर्वांनीच जाणले आहे. साहिल चव्हाण, आदित्य भांड, चारू काळाणे, रोहित भालेराव, चेतन शेलार यांच्या सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी झाला.
- अनिल खोपडे देशमुख, अध्यक्ष, युवा सारथी फाउंडेशन