मुळशी : धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी गेली अनेक वर्षे टाटा कंपनी व सरकारच्या विरोधात धरणग्रस्तांनी वेळोवेळी आंदोलने करून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु निर्ढावलेल्या टाटा कंपनीला व सरकारला अद्यापही जाग आलेली नाही. मुळशी सत्याग्रहाला यावर्षी १०० वर्षे पूर्ण झाली तरी धरणग्रस्तांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. यापुढील काळात टाटा कंपनी व सरकारने धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविले नाहीत तर आम्हाला नाइलाजाने टाटा कंपनीच्या विरोधात टोकाचे पाऊल उचलावे लागेल आतापर्यंत अहिंसेच्या मार्गाने झालेले आंदोलन यापुढे वेळ पडली तर हिंसेच्या मार्गाने पुढे न्यावे लागेल, असे मत मुळशी हवेलीचे माजी आमदार शरद ढमाले यांनी व्यक्त केले. ते माले येथील सेनापती बापट स्मृती स्तंभाजवळ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते मुळशी धरण सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
१६ एप्रिल १९२१ रोजी देशातील पहिला सत्याग्रह मुळशीत सुरू झाला. मुळशी सत्याग्रह नावाने जगप्रसिद्ध सत्याग्रहाची शताब्दी पूर्ती शुक्रवारी मुळशीतील माले गावात धरणग्रस्तांकडून मानवंदना देत साजरी करण्यात आली. यावेळी मुळशी सत्याग्रह चिरायू होवो, भारत माता की जय, वंदे मातरम घोषणेने धरण परिसर दुमदुमला होता. माले येथील सेनापती बापट स्मृतिस्तंभ परिसर येथे सेनापती बापट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुळी सत्याग्रह पर्व दुसरे सुरू करण्यात आले. तसेच टाटा तलाव येथे जाऊन मुळशी सत्याग्रहात हुतात्मा झालेल्या मुळशी धरणग्रस्त तसेच शेतकरी यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुळशी सत्याग्रह मासिकाचे प्रकाशन मुळशी हवेलीचे माजी आमदार शरद ढमाले, मुळशी तालुका पंचायत समिती माजी सभापती रवींद्र ऊर्फ बाबा कंधारे, महावार्ता न्यूज पोर्टलचे संपादक संजय दुधाणे, राष्ट्रवादीचे शरद शेंडे, एकनाथ दिघे, माजी सरपंच हनुमंत सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. सेनापती बापट स्मृतिस्तंभाजवळ माजी आमदार शरद ढमाले, माजी सभापती बाबा कंधारे, पत्रकार संजय दुधाणे व शरद शेंडे यांनी मुळशी सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी धरण विकास मंडळ अध्यक्ष गणपत वाशिवले, माजी सरपंच अनिल अधवडे, अविनाश कानगुडे, माजी सरपंच एकनाथ दिघे, परशुराम वाघचौरे, जयराम दिघे, सचिन पळसकर, संतोष कदम, दत्ता दिघे, अनिल मापाटी, सुहास शेंडे, हनुमंत शेंडे, विजय काळोखे तसेच मुळशी धरण विभाग विकास मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जेव्हा कार्यकर्त्याचा मोबाईल धरणात पडतो तेव्हा
सत्याग्रहींना धरणाच्या पाण्यात उतरून पुष्पांजली अर्पण करीत असतानाच धरणात पदाधिकारी हनुमंत सुर्वे यांचा मोबाईल पाण्यात पडला असता क्षणांचा विचार न करता मुळशी हवेलीचे माजी आमदार शरद ढमाले यांनी मुळशी धरणात घेतली उडी आणि मोबाईल बाहेर काढला. मोबाईल बाहेर काढताच उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून ढमाले यांच्या तत्परतेचे कौतुक केले.
माले येथे मुळशी धरणाच्या पाण्यात उतरून सत्याग्रह सत्याग्रहात हुतात्मा झालेल्या सत्याग्रहींना पुष्पांजली अर्पण करताना लोकप्रतिनिधी व धरणग्रस्त बांधव.