धनंजयसरांचे आजोबा कै. कॅ. शिवरामपंत दामले यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी महाराष्ट्रीय मंडळाची स्थापना केली. १९७७ साली त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव शिवछत्रपती पुरस्कार विजेते रमेशजी दामले यांनी मंडळाची धुरा अतिशय खंबीरपणे सांभाळली. त्यांच्यानंतर म्हणजे २०१२ पासून सरांचे सुपुत्र धनंजय दामले यांनी आजोबा आणि पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून अतिशय समर्थपणे मंडळाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले.
अवघ्या नऊ वर्षांच्या कालावधीत धनंजय सरांनी मंडळाच्या टिळकरोडवरील आवारात कै.भालूकाका दामले ललित कला मंच उभारले. महिलांसाठी जिम आणि योगवर्ग सुरू केले. संस्थेच्या मुकुंदनगर येथील आवारामध्ये सकल ललित कला दालन हे पाचशे आसनक्षमतेचे वातानुकूलित नाट्यगृह निर्माण केले. तसेच क्रीडासंकुलामध्ये तीन टेनिसकोर्टस, दोन फटसाल मैदाने, आंतरराष्ट्रीय दर्जाची स्केटिंग रिंक, कै. रमेश दामले कुस्ती केंद्र, योगशिक्षण आणि संशोधनकेंद्र वेलनेस सेंटर सुरू केले.
संस्थेच्या क्रीडांगणांचा अधिकाधिक क्रीडापटूंना लाभ व्हावा यासाठी अॅथलेट्निस, बास्केटबॉल, फूटबॉल, लॉन टेनिस, हॉकी, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, स्केटिंग, योगा या खेळांची प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यांत आली.
क्रीडेसोबतच शैक्षणिक क्षेत्रासाठी देखील सरांनी ध्यासपूर्ण काम केले. वाणिज्य विद्याशाखेचे कै. रमेश दामले वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले त्यासाठी स्वतंत्र इमारत बांधली. तसेच शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे संपूर्ण नूतनीकरण करून एका मजल्याचे विस्तारीकरण नुकतेच पूर्ण झाले यामध्ये सहा स्मार्ट क्लासरूम्स तयार झाल्या आहेत.
सरांच्या मार्गदर्शनानुसार योग, सुदृढता, क्रीडा कार्यमान, शारीरिक शिक्षण आणि क्रीडेतील समस्या संशोधन, शारीरिक शिक्षण आणि क्रीडेतील अध्यापन पध्दती, खेळाडूंचा आहार आणि पोषण, क्रीडा दुखापती या विषयांवर राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील परिषदा आणि चर्चासत्रांचे आयोजन केले. नुकतीच २४-२५ मार्च रोजी ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. सरांच्या कारकिर्दीत अनेक संस्था महाविद्यालयासोबत सामंजस्य करार झाले.
स्वामी विवेकानंद म्हणत की, मनुष्य शिक्षणापर्यंंत पोहचू शकत नसेल तर शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि हाच आग्रह धनंजय सरांचा क्रीडा, खेळ आणि व्यायामाच्या बाबतीत होता. त्यांनी विविध स्तरावरील विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करून उदयोन्मुख खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली. यामध्ये जिल्हा व राज्य पातळीवर अॅथलेटिक्स, क्रॉसकंट्री, टेनिस, मॅरेथॉन, फूटबॉल, क्रिकेट, मल्लखांब, कुस्ती, कुराश, जिम्नॅस्ट्निस आणि योगा या क्रीडास्पर्धांचे आयोजन केले. गेल्या चार वर्षापासून सरांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी, अत्यंत नाविन्यपूर्ण ऑब्स्टीरेस म्हणजे अडथळ्यांची शर्यत ही स्पर्धा सुरू केली. दरवर्षी पुणे जिल्ह्यातील शाळांचा उतम प्रतिसाद या स्पर्धांना लाभतो. सरांनी २९आॅगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडादिनाचे निमित्ताने खेळ/क्रीडामध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्याचा विशेष उपक्रम सुरू केला.
मंडळाच्या इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या तीन प्राथमिक व तीन माध्यमिक शाळा वाणिज्य शाखेचे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असत.
मंडळासह ते क्रीडक्षेत्राच्या सेवेतही सतत कार्यरत असत. सध्या ते पुणे जिल्हा हौशी अॅथलेट्निस संघटनेचे उपाध्यक्ष, पुणे जिल्हा जलतरण संघटना आणि जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे कार्याध्यक्ष पदावर कार्यरत होते.
सरांनी चला मैदानावर, राहा निरोगी आणि शारीरिक शिक्षण व परिसर या तीन पुस्तकांचे लेखनही केले.
शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रांसह सरांनी सामाजिक क्षेत्राही उल्लेखनीय कार्य केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संवेदनशील होते. कोरोना महामारीमुळे अनेक मैदाने महापालिकेने ताब्यात घेतली. त्यामुळे तेथे सुरू असलेले अनेक स्पोर्टस अनलब्ज बंद झाले त्यामुळे खेळाडूंचा सराव बंद झाला हे कळताच सरांनी या सर्व खेळाडूंना मंडळाच्या मैदानावर सरावाची संधी उपलब्ध करून दिली. तसेच लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांसाठी फळे व भाजीपाला उपलब्ध करून दिला, गरजूंना ही सेवा घरपोच दिली. संस्थेच्या विनानुदानित तत्त्वावरील कार्यरत कर्मचा-यांना संपूर्ण वेतन दिले. अनेक गरजूंना संस्थेत काम मिळवून दिले.
क्रीडापटूंसाठी, व्याधीग्रस्तांसाठी फिजिओथेरपीच्या आधुनिक केंद्राचे भूमीपूजन नुकतेच झाले. महापालिकेच्या मंजूरीनंतर पुढील महिन्यात या केंदाच्या उभारणीचे काम सुरू करण्याचे सर्व नियोजन सरांनी पूर्ण केले होते.
संस्थेच्या वतीने दिले जाणारे विविध पुरस्कार कोरोना महामारीच्या काळात देखील, शासन नियमांचे काटेकोर पालन करून समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. समाजासाठी सुरू केलेली योजना चिरकाल सुरू रहावी हाच त्यांचा ध्यास होता.
धनंजय सर खऱ्या अर्थाने आमचे कुटुंबप्रमुख होते. त्यांना संस्थाचालक, संस्था प्रमुख असल्याचा वृथा गर्व कधीच नव्हता. महाराष्ट्रीय मंडळासारख्या समाजमान्य संस्थेचे प्रमुख असूनही त्यांचे पाय कायम जमिनीवर होते. त्यांच्या वागण्या, बोलण्यात प्रचंड सहजता होती. माणूस पारखण्याची, माणसे जोडण्याची कला त्यांना अवगत होती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचे ते खऱ्या अर्थाने पालनकर्ते होते.
येत्या तीन वर्षांनी म्हणजे २०२४ मध्ये, महाराष्ट्रीयन मंडळाचा शतक महोत्सव संपन्न होणार आहे. हे शतक महोत्सवी वर्ष अतिशय नावीन्यपूर्ण रित्या साजरे करण्याच्या दृष्टीने सरांचे नियोजन सुरू होते.
सरांच्या पत्नी नेहा दामले,दामले घराण्याची चौथी पिढी. चिरंजीव रोहन दामले आणि स्रुषा तन्मयी दामले नक्कीच मंडळाच्या कार्याला एव्हरेस्टची उंची प्राप्त करून देतील अशी खात्री आहे.
(डॉ. सोपान एकनाथ कांगणे)
प्राचार्य, महाराष्ट्रीय मंडळाचे
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय,पुणे