विवेक जागृती अभियान : लक्षवेधी धरणे आंदोलन करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : बारामती येथे धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून गुरूवारी (दि. २९) भारतीय जनता पक्ष व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विश्वासघात दिवस पाळण्यात येणार आहे. फडणवीस यांनी २९ जुलै २०१४ रोजी बारामतीत धनगर समाजाला दिलेले आश्वासन पाळले नाही. उलट समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप या संघटनेने केला आहे. बारामती येथील प्रशासकीय इमारतीसमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. फडणवीस यांच्या निषेधाबरोबरच आघाडी सरकारकडे ठोस मागण्या या आंदोलनातून करणार असल्याची माहिती धनगर विवेक जागती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिली.
ढोणे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्रातील धनगर समाज अनेक वर्षांपासून अनुसुचित जमातीच्या (एसटी) आरक्षणासाठी संघर्ष करतो आहे. मात्र, समाजाला आजवर न्याय मिळालेला नाही. सातत्याने समाजाच्या पदरी निराशाच आलेली आहे. राजकीय मंडळींनी षढयंत्रपूर्वक फसवल्यानेच समाजाची ही दुर्दशा झालेली आहे. याप्रश्नी एका बाजूला समाज प्रबोधन करत असताना दुसऱ्या बाजूला शासनाला कृतीशील भुमिका घेण्यास भाग पाडण्यात येणार आहे. २९ जुलै २०१४ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन बारामतीत दिले, मात्र ते पाळले नाही. प्रत्यक्षात धनगर समाजाचा व्होट बँक म्हणून वापर करून घेतला. केंद्र सरकारला आरक्षण संबंधाची शिफारस पाठवली नाही. टिस सर्वेच्या माध्यमातून मात्र समाजाला वेड्यात काढले. पाच वर्षे समाजाचा बुद्धीभेद करून अक्षरश: धुळफेक केली. अशा षढयंत्रांना धनगर समाजाबरोबर इतर वंचित समाजाने बळी पडू नये, म्हणून धनगर समाज विश्वासघात दिन पाळून लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील सत्तारूढ महाविकासआघाडी सरकारनेही याप्रश्नी ठोस काही केलेले नाही. या सरकारने तातडीने मंत्री समिती स्थापन करून याप्रश्नी कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गकाळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करून तसेच कोरोना प्रतिबंधात्मक सुचनांचे पालन करून प्रातिनिधीक आंदोलन करणार असल्याचे ढोणे यांनी सांगितले.