नितीश गोवंडे
पुणे : सुरूवातीपासूनच राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा गुरूवारी निकाल लागला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले, आणि कसब्याच्या २८ वर्षांच्या इतिहासात प्रथमत कसबा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून गेला. यामुळे महाविकास अघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत निवडणुकीच्या प्रचारावेळी पालकमंत्री चंद्रकात दादा पाटील यांनी ‘हू इज धंगेकर ?’ या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत ‘धंगेकर इज विनर’ च्या घोषणा दिल्या.
गुरुवारी सकाळी कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात सकाळी ८ वाजता कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळी साडेसात पासूनच युती आणि मविआचे काही कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर उभे राहिले होते. यावेळी प्रत्येकाला आपलाच उमेदवार निवडून येईल असा आत्मविश्वास होता. पहिल्या फेरीपासूनच धंगेकरांनी आघाडी घेतल्याने, चौथ्या फेरीपर्यंत ते ३ हजारांच्या आघाडीवर होते, त्यामुळे दहाच्या सुमारास मविआच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढण्यास सुरूवात झाली. यानंतर सतत रवींद्र धंगेकर आघाडीवरच असल्याचे दिसून येताच साडेअकराच्या सुमारास युतीचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्रापासून लांब जाण्यास सुरूवात झाली. दरम्यान हे सगळे होत असताना रवींद्र धंगेकर मात्र कसब्यातील आपल्या संपर्क कार्यालयातच होते. पावणे बाराच्या सुमारास धंगेकरच निवडणूक जिंकणार हे १३ व्या फेरीलाच स्पष्ट झाल्याने, मविआच्या कार्यर्त्यांनी घोषणाबाजीला सुरूवात केली.
‘गणपती बाप्पा मोरया’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘कोण आला रे कोण आला, कसब्याचा वाघ आला’, ‘पुणेकरांना परिवर्तन पाहिजे होते ते मिळाले’, ‘शाहू, फुले, आंबेडकर निवडून आले धंगेकर’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी एमकमेकांवर गुलाल उधळत, ताशाच्या तालावर नाचण्यास सुरूवात केली होती. १२ वाजून ५ मिनिटांनी रवींद्र धंगेकर यांचे मतमोजणी केंद्राच्या परिसरात आगमन होताच, कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घालत खांद्यावर उचलून घेतले. यावेळी मविआच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी दिसून आली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी विशेष कपडे शिऊन घेतले होते. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाचे चिन्ह आणि डोक्यावरील गांधी टोपीवर ‘मी रवी धंगेकर’ असा गणवेश परिधान केला होता. यावेळी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील मतमोजणी केंद्राला भेट देत होते.