पुणे : गेल्या काही वर्षात काँक्रिटचे जंगल झालेल्या पुण्यात अजूनही तब्बल ४० लाखांपेक्षा जास्त झाडे आहेत. सर्वाधिक वृक्षराजी धनकवडी, सहकारनगर भागात असून त्या तुलनेत कसबा, भवानी या मध्यभागात मात्र निव्वळ इमारतींचे जंगल उभे आहे. पालिकेने केलेल्या शहरातील वृक्षगणनेनुसार देशी वृक्षांची लागवड कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाढत्या वृक्षसंख्येमुळे त्या परिसरातील ऑक्सिजन या प्राणवायूचे प्रमाणही वाढत असल्यामुळे शहरात वृक्षराजीचा समतोल निर्माण होण्याची गरज असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.या वृक्षगणनेची परिसरनिहाय आकडेवारी असलेला अहवाल नुकताच तयार झाला आहे. पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांप्रमाणे त्यांच्या हद्दीतील वृक्षसंख्या यात देण्यात आली आहे. त्यानुसार धनकवडी, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे १० लाख १५ हजार १४४ वृक्ष नोंदले गेले आहेत. सर्वात कमी वृक्षसंख्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाची आहे. त्यांच्या हद्दीतील वृक्षसंख्या फक्त १२ हजार ७४ इतकीच आहे. त्यानंतर कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ३२ हजार १६२ वृक्ष आहेत. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय ६५ हजार ६७२, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय ७२ हजार २५ इतके वृक्ष नोंदवण्यात आले आहेत. दोन लाखापेक्षा जास्त वृक्षसंख्या असलेली क्षेत्रीय कार्यालये याप्रमाणे- नगररस्ता-वडगावशेरी- ४ लाख ९४ हजार २०, कोथरूड- बावधन- ३ लाख ८८ हजार ७८३, हडपसर-मुंढवा- ३ लाख ८६ हजार ९५, येरवडा-कळस-धानोरी- २ लाख ४० हजार ११०, कोंढवा-येवलेवाडी- १ लाख ९१ हजार ४५९, ढोले पाटील-२ लाख ८२ हजार ४६१, वारजे-कर्वेगर- १ लाख ५५ हजार ७५४, औंध बाणेर- ३ लाख १८ हजार ९०८, शिवाजीनगर घोले रस्ता- ३ लाख ५५ हजार २४. याच गणनेत देशी वृक्षांच्या लागवडींची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. एकूण वृक्षगणनेत फक्त २८ टक्के व परदेशी वृक्षांची संख्या ७२ टक्के दिसते आहे. परदेशी वृक्षांच्या वाढत्या संख्येमुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. गुलमोहर, सुबाभूळ तसेच देशी समजले जाणारे अन्य काही वृक्ष प्रत्यक्षात परदेशी असल्यामुळे देशी वृक्षांची संख्या कमी दिसते आहे. वड, पिंपळ, चिंच, फणस, जांभूळ, नारळ, सुपारी असे वृक्ष देशी समजले जातात. एक पूर्ण वाढलेला वृक्ष एका व्यक्तीला दिवसभर पुरेल इतका ऑक्सिजन तीन ते चार दिवसांत वातावरणात सोडत असतो. तसेच तो हवेतील कार्बन डाय ऑक्साईडही शोषत असतो. त्याशिवाय वृक्षांवर पक्षीजीवन असते. त्यावरच प्राणीजीवनही अवलंबून असते. पाण्यासाठीही वृक्षराजीचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच मानवी जीवनासाठीही वृक्ष आवश्यक आहेत. पुण्यात माणशी एक वृक्ष असे प्रमाण या गणनेनुसार दिसत असून ते आणखी वाढायला हवे असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.