पुणे : तरूण वन्यजीव संशोधक आणि नदी संवर्धनासाठी काम करणारे धर्मराज पाटील यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. पक्ष्यांविषयी, नदीविषयी भरभरून बोलणारा हा युवा असा अचानक निघून गेला आहे. पक्षी हे स्थलांतर करतात आणि पुढच्या वर्षी परत येतात. परंतु, या पक्षी संशोधकाने आता कायमचेच स्थलांतर केले असून, ते पुन्हा परत येण्यासाठी नाही. त्याच्या केवळ आठवणीच आता इथं राहिल्या आहेत.
येरवडा येथील डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्य संरक्षित व्हावे, यासाठी तो गेली अनेक वर्षांपासून झटत होता. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये त्याला ब्रेन हॅमरेज झाले आणि अचानक रूग्णालयात दाखल करावे लागले होते. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. तसेच सूज आलेली होती. काही दिवसांपासून तो रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. पण त्याची झुंज अपुरी पडली. तो मूळचा कोल्हापूरचा हाेता आणि पुण्यात एकटाच राहत होता. जीवितनदी या संस्थेसोबत तो अनेक वर्षांपासून काम करत होता. डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्य संरक्षित व्हावे म्हणून अनेकदा आंदोलने केली. साखळी पध्दतीने उपोषणही केले. महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन त्याने डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्यासाठी खूप प्रयत्न केले. अखेर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत तो पोचला होता. नुकतेच आदित्य ठाकरे यांनी अभयारण्याला भेट दिली होती. तेव्हा त्यांना धर्मराज यांनेच सर्व माहिती दिली होती. त्याच्या लढ्याला आता कुठे यश येत होते आणि नियतीने या वन्यजीव संशोधकालाच हिरावून घेतले.