धस-मुंडेंची भेट माणुसकीच्या नात्याने : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 13:21 IST2025-02-16T13:19:24+5:302025-02-16T13:21:40+5:30
त्या दोघांनी भेटणे यात काहीही गैर नाही. ते माणुसकीच्या नात्याने भेटले आहेत, अशी मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

धस-मुंडेंची भेट माणुसकीच्या नात्याने : अजित पवार
पुणे : धनंजय मुंडे हे मंत्री आहेत तर सुरेश धस हे आमदार आहेत. त्या दोघांनी भेटणे यात काहीही गैर नाही. ते माणुसकीच्या नात्याने भेटले आहेत, अशी मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. या भेटीसंदर्भात देशमुख कुटुंबीयांच्या भावना याेग्य आहेत. कारण त्यांच्या घरातील कर्ता पुरुष गेला आहे, असेही नमूद केले.
पुणे महापालिकेच्या अमृतमहोत्सवी समारंभास अजित पवारांनी शनिवारी उपस्थिती लावली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, धस-मुंडे यांची विचारधारा वेगळी असली, तरी एकमेकांचे शत्रू नाहीत. त्यांचे पूर्वीपासून संबंध आहेत. सहकारी आजारी असल्याने धस मुंडेंना भेटले, याचा वेगळा अर्थ काढू नये. संतोष देशमुख प्रकरणाचा सीआयडी, एसआयटी, न्यायालयातून लवकर रिपोर्ट येईल. त्यानंतर दोषींना कडक कारवाई करू. दोषीची फिकीर केली जाणार नाही. एक व्यक्ती अद्याप सापडलेली नाही. तपास यंत्रणांना कोणालाही सोडणार नाही. आरोपींना राज्य सरकार पाठीशी घालणार नाही, असेही पवार म्हणाले.
‘पुण्यातील वाहतूक नियंत्रणासाठी भुयारी मार्गाच्या पर्यायाविषयी चर्चा झाली. यामध्ये कात्रज ते येरवडा हा सहा पदरी भुयारी मार्ग उभारण्यास मान्यता दिली आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी एक हजार सीएनजी बसेस घेतल्या जाणार आहेत. पुढील काळात पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवडची लाेकसंख्या अधिक हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासंदर्भात टाटाच्या मुळशी धरणातून पाणी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दाेन्ही शहरातील पाण्याची गरज भागविली जाऊ शकते.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयाेग करता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. नदी सुधार प्रकल्पाबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग काढले जातील. जीबीएस हा आजार पाण्यामुळे हाेत असल्याची चर्चा हाेती. आता काेंबड्यांचे मांस खाऊन हा आजार हाेत असल्याची माहिती पुढे येत आहे. मांस कच्चे खाल्ल्याने हा आजार हाेत आहे, त्यामुळे काेंबड्या मारून टाकण्याचे काही कारण नाही,’’ असेही अजित पवार यांनी नमूद केले.
निवडणुका होण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील
"ओबीसी आरक्षणासंदर्भातील प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत. त्याबाबतही चांगले वकील देऊन हा प्रश्न मार्गी लावू. ओबीसी घटकालाही इतरांप्रमाणे निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, ही भूमिका आम्ही घेतली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा झाली आहे.' लोकांचे प्रश्न नगरसेवक, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य सोडवत असतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
रिंगरोडचे काम लवकरच सुरू होईल
रस्ते महामंडळाचा रिंगरोड करत आहोत, त्याचे चार-पाच निविदा अंतिम झाल्या आहेत, उर्वरित निविदा अंतिम होतील. रिंगरोड जातो, तेथे काही ठिकाणी इमारती झाल्या आहेत, तेथे बाजूने रिंगरोड जाईल. इमारती सोडून बाजूची जमीन संपादित करावी, असे आदेश जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना दिले आहेत. पीएमआरडीएच्या रिंगरोडचे काम लवकरच सुरू होईल, असेही पवार म्हणाले.
अजित पवार असेही म्हणाले...
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काेल्ड वाॅर असल्याच्या चर्चा खाेट्या आहेत. बातम्या नसल्या की अशा बातम्या तुम्ही चालविल्या जातात.
- नदी सुधारमुळे पुराचा धोका वाढेल, हा आरोप चुकीचा आहे, जलसंपदा विभागाने याउलट नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन काम करू.'