किवळे : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील किन्हई येथील एका ग्रामस्थाच्या गोशाळेच्या बांधकामासाठी परवानगी देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना कॅन्टोन्मेंटच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या प्रमुखास राहत्या घरी बापदेवनगर (किवळे) येथे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. चौहान यास बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.श्याम शिशुपाल चौहान असे ताब्यात घेण्यात आलेल्या पथकप्रमुखाचे नाव आहे. चौहान हा बोर्डात आरोग्य निरीक्षक पदावर काम करीत आहे. त्याच्याकडे अतिक्रमणविरोधी पथक प्रमुखपदाचीही जबाबदारी आहे. राजू नामदेव पिंजण (रा. किन्हई, देहूरोड) यांनी चौहाप लाच मागत असल्याबाबत सीबीआयकडे तक्रार केली होती. पिंजण यांनी किन्हई येथे गोशाला बांधण्यासाठी बोर्डाकडे परवानगी मागितली होती. मात्र बांधकाम परवानगी देण्यासाठी चौहान यांनी लाच मागितल्याने पिंजण यांनी सीबीआयकडे चौहान यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार मंगळवारी तीनच्या सुमारास चव्हाण चौहानला बापदेवनगर येथील घरी तक्रारदाराकडून १५ हजारांची रक्कम घेताना सीबीआयचे निरीक्षक अंजीर जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांनतर दुपारी चारला सीबीआयच्या पथकाने बोर्डाच्या कार्यालयातून संबंधित सर्व कागदपत्रे असलेली फाईल ताब्यात घेतली. त्यासाठी बोर्डाच्या दोन विविध विभागांतील दोन पंच घेतले आहेत. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागात निरीक्षक कमी असल्याने कामाचा व्याप लक्षात घेऊन आवश्यक पात्रता असल्याने चौहान यांना आरोग्य निरीक्षक पदावर काम करण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)
देहूरोड अतिक्रमणविरोधी प्रमुख लाच घेताना रंगेहाथ
By admin | Published: April 09, 2015 5:14 AM