पुणे : केवळ व्हेंटिलेटर न मिळाल्याने कोरोना संक्रमित ज्येष्ठ शास्त्रज्ञाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या शास्त्रज्ञाला कोरोना असल्याचे मृत्यूपश्चात निष्पन्न झाले आहे. कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटर्स आणि आयसीयू उपलब्ध होत नसल्याने आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत.
डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन (वय ६१) असे मृत्यू झालेल्या शास्त्रज्ञाचे नाव आहे. ते पुण्यातील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेमधून वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्यामागे पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. डॉ. नरसिंहन हे मंगळवारी घरामध्ये एकटेच होते. त्यांना संध्याकाळी सहाच्या सुमारास श्वसनाचा त्रास झाला. त्यांना नगर रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. त्यांची प्रकृती खालावत चाललेली असल्याने नातेवाईकांनी शहरातील अन्य रुग्णालयांकडे व्हेंटिलेटर बेड सँदर्भात चौकशी केली. परंतु, त्यांना कुठेच बेड उपलब्ध झाला नाही.
नातेवाईकांनी शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस रमेश अय्यर यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. अय्यर यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात संपर्क साधला. त्यांना शहरातील रुग्णालये, तेथील बेड आणि रुग्ण यांची माहिती असलेल्या डॅशबोर्ड माहिती देण्यात आली. व्हेंटिलेटर्स उपलब्ध असल्याचे दर्शवित असलेल्या चार रुग्णालयांशी त्यांनी संपर्क साधला. परंतु, तेथेही बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. सर्व प्रयत्न संपल्यावर नातेवाईकांनी डॉ. नरसिंहन यांना रात्री नऊच्या सुमारास ससून रुग्णालयात हलविले.
ससून रुग्णालयातही त्यांना व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होऊ शकला नाही. काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक अरविंद शिंदे यांनी ससून व्यवस्थापनाशी संपर्क साधून बेड उपलब्ध करून देण्याची विनंती केली. परंतु, व्हेंटिलेटरसाठी तीन रुग्ण प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात आले. डॉ. नरसिंहन यांची खालावलेली परिस्थिती आणि उपचारांची तातडीची आवश्यकता असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. परंतु, त्यांचा बुधवारी पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. उपचारादरम्यान त्यांची घेण्यात आलेली कोरोना चाचणी मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आली. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.