पुणे : अरे वाजवा रे वाजवा, गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा-झांज मंडळाच्या सदस्य संख्येवर आता कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे वादकांनो दणक्यात वादन करा! विसर्जन मिरवणुकीतील ढोल ताशा- झांज पथकातील सदस्यांची संख्या मर्यादित करणा -या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या ( एनजीटी पश्चिम झोन ) आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देऊन पथकांना एकप्रकारे दिलासा दिला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकार, पुणे प्राधिकरण आणि इतरांना नोटीस पाठवित 'त्यांना ढोल, ताशा वादन करू द्या, ढोलताशा वादन पुण्याच्या हदयातच आहे, असे नमूद करीत ढोलताशा वादन दणक्यात करण्यासाठी पथकांना हिरवा कंदील दिला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिल्याने ढोलताशा पथकांमध्ये उत्साह संचारला आहे.
पुण्याच्या गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे " ढोलताशा' वादन हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे . देशविदेशासह महाराष्ट्रातील भाविक केवळ ढोलताशा पथकांचे अभूतपूर्व वादन ऐकण्यासाठी पुण्याच्या गणेशोत्सवाला हजेरी लावतात. विसर्जन मिरवणुकीसाठी विविध पथकांकडून भाविकांना आकर्षून घेण्यासाठी नानाविविध ताल निर्मित केले जातात. यंदाची विसर्जन मिरवणूक देखील त्याला अपवाद ठरली नसून, पथकांची विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी देखील सुरु झाली आहे. दरम्यान, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दि. 30 ऑगस्ट रोजी पुण्यातील गणेशमूर्ती विसर्जना च्या वेळी प्रत्येक ढोल-ताशा-झांज मंडळाच्या सदस्यांच्या संख्येवर मर्यादा घातली होती. ढोल-ताशा-झांज पथकात 30 पेक्षा जास्त सदस्य असणार नाहीत, याची खात्री करावी, अशा सूचना पोलिसांना दिल्या होत्या. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास पोलिसांनी साहित्य जप्त करावे, असेही आदेशात म्हटले होते तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विसर्जन मिरवणुकीदरम्यान ठराविक वेळेतील ध्वनी प्रदूषण मोजावे. उत्सवातील लाऊड स्पीकरसह मिरवणुकीत डीजेच्या वापरावरही एनजीटीने निर्बंध घातले होते. एनजीटीच्या या संख्या मर्यादित करण्याच्या आदेशाने ढोलताशा पथकातील सदस्यांच्या आनंदात काहीसे विरजण पडले होते. या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायाधीश जे. बी. पारदीवाला, मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी (दि. १२) याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने एनजीटीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे आता ढोल- ताशा पथकांवर किती सदस्य असावेत, याची कोणतीही मर्यादा असणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.