पुणे : एरवी पुण्याच्या रस्त्यांवरून बिनदिक्कतपणे दिवसा वा रात्री फिरणे सुरक्षित आहे, असे म्हणणे केवळ आभास ठरू लागले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्याच्या रस्त्यांवर रात्री-बेरात्री होणाऱ्या वाटमाऱ्यांमुळे नागरिकांना धडकी भरली आहे. दुचाकी अथवा चारचाकींमधून येणारे टवाळ काहीही कारण काढून नागरिकांना अडवितात. काही समजण्याच्या पूर्वीच मारहाण करून ऐवज लुटून पसार होतात. या वाढत्या घटनांकडे पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष घातक आहे.गेल्याच आठवड्यात पौड फाट्याजवळ असलेल्या दशभुजा गणपती मंदिराजवळ आजीला जेवणाचा डबा घेऊन जात असलेल्या एका सुशिक्षित तरुणाला दुचाकीवरून आलेल्या दोघाजणांनी अडविले. काही कळायच्या आतच शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्या आणि दगडाने मारहाण सुरू केली. त्याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. जीव वाचवण्यासाठी हा तरुण पोलीस चौकीच्या दिशेने धावल्यामुळे बचावला. वास्तविक केवळ हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आणि गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाचे कार्यालय असून, गुन्हेगारांनी लूटमार करण्याचे धाडस केले.अशा स्वरूपाच्या घटना वाढत चालल्या आहेत. गुरुवारी दुपारी अभिनेता आरोह वेलणकरलाही टोळक्याने मारहाण केली. डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. बालगंधर्व पोलीस चौकीजवळील बसथांब्यावर बसची वाट पाहात उभ्या असलेल्या तरुणाला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याने विरोध करताच त्याच्यावर चाकूने वार करून, त्याचा मोबाईल आणि रोकड चोरट्यांनी लंपास केली होती. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येही काही महिन्यांपूर्वी एकाने काहीही कारण नसताना रस्त्यावर दिसेल त्याला चाकूने भोसकायला सुरुवात केल्याचे उदाहरणही ताजे आहे. काही दिवसांपूर्वी एनडीए रस्त्यावर मोहन भगत (वय ४५, रा. कोथरूड) यांना कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील ७५ हजारांची सोनसाखळी हिसकावण्यात आली होती, तर पत्नीची वाट पाहात उभ्या असलेल्या रवींद्र लगड (वय ३४, रा. क्वीन्स गार्डन) यांच्या गळ्यातील १० हजारांची सोनसाखळी हिसकावण्यात आल्याची घटना कोंढव्यातील तिरंगा कलेक्शन दुकानासमोर घडली होती. महामार्गावर होतायेत सर्वाधिक प्रकारवारजे, कात्रज, मुंबई-बंगळुरू महामार्ग, हडपसर, सोलापूररस्ता, पुणे-मुंबई महामार्ग या भागात वाटमाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ट्रकचालकांना लुटण्यात आल्याच्या घटना, तर दिवसागणिक घडत असतात. पहाटेच्या वेळी ट्रक रस्त्याच्या कडेला लावून गाडीत झोपलेल्या चालकांना हत्याराच्या धाकाने आणि मारहाण करून लुटण्याचे प्रकार घडत आहेत. मध्य वस्तीतील मार्केटयार्डमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना; तसेच व्यापाऱ्यांनाही अशाच प्रकारे लुटण्यात येत असल्याचीही उदाहरणे आहेत.
‘धूम’स्टाइल वाटमाऱ्यांनी दहशत
By admin | Published: January 08, 2017 3:19 AM