पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात शुक्रवारी नाटकाच्या सादरीकरणादरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून नाटक बंद पाडले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि झटापट झाली. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांनी स्वतः घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
ललित कला केंद्रातील खुल्या रंगमंचावर शुक्रवारी रात्री रामायणातील पात्र असलेल्या काही व्यक्तिरेखा रामलीला हे नाटक सादर करीत होत्या. नाटकातील संवादादरम्यान शिवराळ भाषेत संवाद बोलले जात होते. त्यामुळे तेथे उपस्थित अभाविपच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडले. यावेळी केंद्रातील विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची तसेच झटापटही झाली. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ची घोषणाबाजी करून नाटक बंद पाडले. हे नाटक सादर करू नये, असे सांगून विरोध दर्शविला. अभाविपच्या कार्यकर्त्यांमुळे विद्यार्थ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकाराच्या चित्रफितीही समाजमाध्यमावर व्हायरल झाल्या. दरम्यान, घडलेल्या प्रकारासंदर्भात माहिती घेण्यासाठी प्रा. भोळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.