पुणे : देशातील ॲलाेपॅथीच्या डाॅक्टरांची शिखर संघटना असलेल्या ‘इंडियान मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) च्या महाराष्ट्र शाखेत अध्यक्ष पदावरून धुसफुस सूरू असल्याचे समाेर आले आहे. शेवटी हा वाद शेवटी धर्मदाय विभागापर्यंत पाेचला आणि त्यांनी मध्यस्ती केल्यानंतर हा वाद मिटला व अध्यक्षांच्या पदग्रहणाचा मार्ग माेकळा झाला.
महाराष्ट्र आयएमएचे अमरावती येथील नवनिर्वाचित अध्यक्ष डाॅ. दिनेश ठाकरे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, अध्यक्षपदाची सुत्रे हस्तांतरीत करू नयेत यासाठी डाॅ. वसंत रामरावजी लुंगे यांनी मनाई अर्ज केला होता. परंतु, हा अर्ज पुण्यातील धर्मादाय उपायुक्त राहूल मामू यांनी फेटाळला. त्यामुळे २६ नाेव्हेंबर राेजी अमरावती येथील राज्यस्तरीय परिषदेमध्ये अध्यक्षांना पदभार स्वीकारता येणार आहे. आय एम ए महाराष्ट्र या संस्थेची नाेंद पुण्यात आहे. त्यामुळे पुण्यातील धर्मादाय विभागाने त्यावर निर्णय दिला.
आयएमए शाखेच्या नियम नियमावलीत दुरूस्ती करण्यासाठी धर्मादाय उपायुक्त राहूल मामू यांच्यासमोर स्कीम अर्ज प्रलंबित आहे. मावळते अध्यक्ष डाॅ. रविंद्र कुटे यांनी कार्यकारिणीतील डाॅ. जयंत नवरंगे, डाॅ. आरती निमकर व डाॅ. प्रकाश मराठे यांना हा स्कीम अर्ज दाखल करण्यास प्राधिकृत केले होते. दरम्यान डाॅ. लुंगे यांनी या स्कीम अर्जामध्ये हस्तक्षेप करत मनाई अर्जही दाखल केला.
आय एम ए महाराष्ट्र शाखेच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी मनाई अर्जच अवैध असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. धर्मादाय कायद्याच्या तरतूदींनुसार स्कीम अर्जामध्ये मनाई हुकूम देण्याचा धर्मादाय उपायुक्तांना अधिकार नसल्याने मनाई अर्जाची सुनावणी त्यांचे समोर होऊ शकत नसल्याने तो फेटाळण्यात यावा अशी मागणी केली.
नवनिर्वाचित अध्यक्ष डाॅ. ठाकरे यांचे वतीने अर्जास विरोध करताना ॲड. गजानन गवई व ॲड. रवी वर्धे यांनी मूळ निवडणुकीस हरकतदारांनी आक्षेप घेतला नसल्याने पदग्रहण करण्यास मनाई करता येणार नाही असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून धर्मादाय उपायुक्त राहूल मामू यांनी ॲड. कदम जहागिरदार यांनी धर्मादाय कायद्याच्या तरतूदींनुसार स्कीम अर्जामध्ये मनाई हुकूम देण्याचा धर्मादाय उपायुक्तांना अधिकार नसल्याचा युक्तिवाद मान्य करून मनाई अर्ज फेटाळला. याकामी ॲड. अमित टकले व ॲड. शुभम् नागणे यांनी सहाय्य केले.